मा. आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांची मागणी
अमळनेर : तालुक्यातील सर्व भागात अतिवृष्टी होत आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत शेतकरी मेटकुटीस आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मा. आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
गेल्या चार वर्षांपासून तालुका गंभीर कोरड्या दुष्काळाचे चटके सहन करत होता. सतत अवर्षन प्रवण क्षेत्र असलेल्या अमळनेर तालुक्यातील शेतकरी यंदा अतिवृष्टी मुळे हैराण झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातील सुरुवातीस खंडीत पाऊस, शेवटच्या काळात सप्टेंबर १९ मध्ये झालेली अतिवृष्टी व गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधारेने काढणीला आलेल्या सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. कापूस, ज्वारी, मका, बाजरी, कांदा आदी पिके नेस्तनाबूत झाली असून बहुतांश पिके कुजून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरी त्रासून गेला आहे. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे प्रशासनाने जे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात नसतील त्यांच्यामार्फत २०१९ च्या हंगामातील परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी साहेबराव पाटील यांनी केली आहे.