अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवा

अमळनेर : अति वेगाने अधोगतीच्या मार्गाने भरकटत चाललेल्या सध्याच्या अस्थिर काळात वाट चुकलेल्यांना यथायोग्य वळण लावण्यासाठी संतांची शिकवण गरजेची आहे. या उद्देशाने सालाबादाप्रमाणे वै.प.पू. ह.भ.प. रामदासबाबा वराडे व वै.प.पू. ह.भ.प. विठ्ठल बाबा (मोठेबाबा) यांच्या कृपा-आशिर्वादाने अमळनेेर तालुक्यातील शिवक्षेत्र खवशी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे परिसरात अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाला सुरुवात झाली. सप्ताहाचे हे अमृतमहोत्सवी (७५ वे) वर्ष आहे. ता.४ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२५ या काळात दररोज कार्यक्रम सुरु आहेत. सप्ताहभर दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ तेे ११ हरि किर्तन याप्रमाणे कार्यक्रम सुरु राहतील.
गुरुवार ता.४ रोजी ह.भ.प. अविनाश महाराज- भामेर, शुक्रवार ता.५ रोजी ह.भ.प. स्वप्निल महाराज- गिरड, शनिवार ता.६ रोजी ह.भ.प. भालचंद्र महाराज- खवशी, रविवार ता.७ रोजी ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव- मालेगाव, सोमवार, ता.८ रोजी ह.भ.प. विश्वनाथ महाराज कोल्हे- नाशिक, मंगळवार ता.९ रोजी ह.भ.प. विश्वनाथ महाराज- वाडे, बुधवार ता.१० रोजी ह.भ.प. बाजीराव महाराज चंदिले- आळंदी यांचे किर्तनाचा कार्यक्रम होईल. गुरुवार ता.११ रोजी ह.भ.प. दिनानाथ महाराज सावंत- नामपूर यांचे सकाळी ९ ते ११ या वेळात काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. ह.भ.प. भालचंद्र महाराज व गणेश महाराज, माऊली भजनी मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कै.हेमलता लक्ष्मण गोसावी यांचे स्मरणार्थ श्री भानुगीर ओंकारगीर गोसावी व परिवार महाप्रसादाचे मानकरी आहेत. आठ दिवस किर्तनकार सेवा घेणारे सकाळ संध्याकाळ चे विविध मानकरी आहेत. खवशी येथील श्री विजय गोविंदराव कापडे यांनी आई स्व. माधुरी गोविंदराव कापडे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे रंग कामासाठी ४५०००/- रुपये देणगी दिली आहे. याशिवाय ग्रामस्थांनी देखील विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी सढळ हाताने भरीव मदत दिली आहे. पंचक्रोशीतील भाविक व भजनी मंडळ यांचेही सहकार्य लाभणार आहे. दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेनंतर बँडच्या तालावर दिंडी मिरवणूक सोहळा पार पडेल. समस्त नागरिक, भाविक, सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने किर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान, शिवशक्ती देवस्थान व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.