आम आदमी पार्टी आणि मित्र परिवाराचाही सहभाग

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : येथील बोरी नदीवर आज, दिनांक ७ ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टी आणि मित्र परिवाराच्या वतीने बॅरिकेट्स स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदीने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे बोरी नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणावर कचरा आणि बॅरिकेड्स च्या लोखंडी जाळीत गाळ साचून होता. दिनांक ९ ऑगस्ट रोजी असणाऱ्या ‘जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून हा संपूर्ण साचलेला कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
अमळनेर शहरामध्ये पुरामुळे झालेले नुकसान आणि निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावणे आणि शहराचे आरोग्य जपणे हा मुख्य उद्देश ठेऊन आम आदमी पार्टी आणि मित्र परिवार बोरी नदी परिसरात बॅरिकेट स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.
नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा हा मुख्य हेतू…
बोरी नदीवरील बॅरिकेट्सच्या लोखंडी जाळीत साचलेला कचरा वेळेत साफ न केल्यास, भविष्यात पुन्हा पूर आल्यास पाणी अडकून नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी लोखंडी जाळीत अडकलेला संपूर्ण कचरा पूर्णपणे साफ करण्यात आला आहे. हा उपक्रम पूर्णपणे समाजहित आणि स्वच्छतेच्या उद्देशाने राबवण्यात आला असून, कोणाच्याही भावना दुखावण्याचा यात कोणताही हेतू नाही, असे आम आदमी पार्टी आणि मित्र परिवाराच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी हे योगदान देण्यात आले.