बॅडमिंटन, टेबल टेनिस स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
सिन्नर : तालुक्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावे आणि भविष्यात उत्कृष्ट खेळाडू घडावेत या उद्देशाने सिन्नर स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने दि.२४ व २५ ऑक्टोबर रोजी सारडा स्पोर्टस सेंटर येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. याप्रसंगी युवा नेत्या सीमंतिनी कोकाटे, सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले आणि खासदार राजाभाऊ वाजे यांचे सहाय्यक रायते मामा यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रॅकेटचे फटके, अचूक टाइमिंग आणि विजयासाठीची जिद्द अशा उत्साही वातावरणात सिन्नरमध्ये बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि टेबल टेनिस स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांसह लहान गट आणि खुल्या गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडूंनी सादर केलेल्या उत्कृष्ट खेळाला उपस्थितांकडून दाद मिळाली. या स्पर्धेत वाजे विद्यालय एस.जी. पब्लिक स्कूल, होरायझन अकॅडमी सिन्नर, नांदूर शिंगोटे विद्यालय तसेच इगतपुरी येथील विद्यालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि कौशल्याच्या जोरावर आपली छाप पाडली.

खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे शालेय क्रीडा प्रशिक्षक तसेच सारडा स्पोर्ट्स सेंटरचे प्रशिक्षक मोहन पाटील आणि संतोष साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले. सिन्नर स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष किरण भंडारी, उपाध्यक्ष वैभव मूत्रक आणि सचिव रवी मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य किरण गोजरे, किरण वाघ, कैलास शिंदे, योगेश शिंदे विनोद दाताळ, सूर्यकांत थोरात, अभी सायखेडकर, गणेश पगार, प्रसाद पाटोळे, गणेश शिरसाठ यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले. गणेश दिघे यांनी सूत्रसंचालन केले.