वनविभागाच्या प्रयत्नाने बिबट्या जेरबंद; वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास


(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर :
संपूर्ण तालुक्यात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. अंतुर्ली रंजाणे परिसरात काही जनावरे फस्त करणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने मागोवा घेत त्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरे लावले होते. दिनांक १६ रोजी पहाटे पिंजारी मुस्लिम कब्रस्थान मधील पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. तालुक्यातील शिरूड, मंगरूळ, पिंपळे, ढेकू रस्ता, धार रस्ता, अंतुर्ली रंजाणे, ताडेपुरा, टाकरखेडा परिसरात बिबट्याचा वावर होता. यामुळे शेतात जाणारे शेतकरी, शेतमजूर धास्तावले होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण, उपवनसंरक्षक राम धोत्रे, सहाययक वनसंरक्षक अमोल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, योगेश पाटील, मनिषा मोरे, वनमजुर प्रवीण पाटील, समाधान पाटील, मयुर पाटील दररोज गस्त घालून विविध ठिकाणी पिंजरे लावत होते. माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी पिंजऱ्यामध्ये बिबट्याला शिकारीसाठी बकऱ्या दिल्या होत्या. सरपंच सचिन पाटील यांनीही सहकार्य केले होते.

वनपाल गुलाब पिंजारी दररोज रात्री उशिरापर्यँत आपल्या कर्मचाऱ्यांसह आणि पहाटे गस्त घालत असत. त्याचा वावर पाहून पिंजऱ्याची जागा बदलवत असत. अखेरीस दिनांक १६ रोजी पहाटे तांबेपुरा अंतुर्ली रस्त्यावर असलेल्या पिंजारी मुस्लिम कबरस्थान मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले असून बिबट्या कुठे सोडायचा याबाबत ते निर्णय घेणार आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!