आधार बहुउद्देशीय संस्था आणि अंकुर फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने प्रयत्न

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : रोटरी क्लब अमळनेर तर्फे एड्ससह जीवन जगणाऱ्या बालकांना व रुग्णांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप तसेच प्रोटीन किट व सकस आहाराचे पाकीट देण्यात आले. अमळनेर येथील रोटरी हॉल येथे कार्यक्रम पार पडला.
रोटे. मकसूद बोहरी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आधार संस्थेच्या प्रमुख सौ. भारतीताई पाटील यांच्या प्रेरणेने व आधार बहुउद्देशीय संस्था आणि अंकुर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, रोटरी क्लब अमळनेर गेल्या चार वर्षांपासून दर महिन्याला नियमितपणे प्रोटीन किटचे वाटप करीत आहे. एड्ससह जीवन जगणाऱ्या बालकांची व रुग्णांची शारीरिक सुदृढता वाढावी याकरिता रोटरी सतत प्रयत्नशील असते. दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा याकरिता फराळाचेही वाटप करण्यात येते.

यावेळी सौ. मेहराज हुसेन बोहरी यांनी स्वतः शिवलेल्या बेस्ट आऊट ऑफ वेस्ट या उपक्रमांतर्गत मुलींकरिता ६० फ्रॉक्सचे वितरणही करण्यात आले. स्वादिष्ट नमकीनचे प्रमुख रोटे. विजय पाटील यांच्यातर्फे दिवाळी फराळाचे पॅकेट्स तर रोटे. प्रतीक खंडेरिया यांच्यातर्फे प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील, रोटे. चेलाराम सैनानी, रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक खंडेरिया तसेच बहुउद्देशीय आधार संस्थेतर्फे सौ. डॉ. भारतीताई पाटील, सौ. रेणुका प्रसाद ताई तसेच बहुउद्देशीय आधार संस्था आणि अंकुर फाउंडेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.