शहर विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर व शिवसेना (शिंदे गट) चे डॉ. परिक्षित बाविस्कर यांच्यात रस्सीखेच

अमळनेर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. अमळनेर नगरपरिषद मध्ये ‘अनुसूचित जमाती’ चे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले. अमळनेर नगरपरिषदेसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष व शहरातील १८ प्रभागात एकूण ३६ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी पर्यंत काहींनी माघार घेतली. माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकूण १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात, मुख्यत्वे अमळनेर शहर विकास आघाडी चे ३६ उमेदवार, शिवसेना शिंदे गट २९ उमेदवार, अन्य पक्षाचे ८ व अपक्ष ५५ असे एकूण १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील शहर विकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध निवड होऊन आघाडीने आपले खाते उघडले आहे. शहर विकास आघाडी व शिवसेना आपलाच उमेदवार नगराध्यक्ष होईल अशा अविर्भावात आहेत. एकंदरीत नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर व शिवसेना (शिंदे गट) चे डॉ. परिक्षित बाविस्कर यांच्यात रस्सीखेच होणार हे चित्र स्पष्ट आहे. नगराध्यक्ष पदासाठी असलेले इतर उमेदवार कोणाची मते आपल्याकडे खेचतात यावर खरे गणित अवलंबून आहे. निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून वातावरण तापू लागले आहे. प्रचार करताना सर्वच उमेदवार शहराच्या सर्वांगीण शहर विकासाच्या वल्गना करीत आहेत.
आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष तथा शहर विकास आघाडीच्या नेत्या जयश्री पाटील अमळनेर शहर विकास आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. साहजिकच आघाडीच्या उमेदवारांना शहरभर प्रतिसाद मिळत आहे. एक उमेदवार बिनविरोध निवड होऊन शहर विकास आघाडीने पहिला विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. शहर विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना काही प्रमुख संघटनांनी लेखी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे.

शहर विकास आघाडी तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना ‘शिट्टी’ या चिन्हावर उमेदवारी देण्यात आलेली आहे. जितेंद्र ठाकूर हे स्वतः पत्रकार असून उच्चशिक्षित आहेत. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहे. पत्रकारिता व्यवसाय करत असताना कोणाचे मन दुखावले असेल, काही चुकाही झाल्या आहेत. त्या चुकांचा स्विकार करत त्यांनी सभांमधून मतदार जनतेची नम्रपणे माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा म्हणावा लागेल. मतदार जनता माफ करेल की नाही ? हे त्या त्या मतदारांवर अवलंबून आहे. स्थानिक वास्तव्य, शहरातील मातब्बर नेत्यांचे पाठबळ आणि शहराची परिपूर्ण माहिती असल्याने विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांना आहे.
शहर विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना काही प्रमुख संघटनांनी लेखी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे. अमळनेर मार्केट यार्ड आडत असोसिएशन, गुमास्ता कामगार असोसिएशन आणि राष्ट्रीय हमाल मापाडी कामगार युनियन यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार संघटनेने लेखी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. तथापि, दि.२८ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य संकुलात आघाडीतर्फे सर्व व्यापारी संघटनांचा मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता व्यापारी बांधवांनी शांत राहण्याची भुमिका घेतलेली दिसून आली.

शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून एक सुसंस्कृत, निष्कलंक असा चेहरा डॉ. परिक्षित श्रीराम बाविस्कर यांना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी देण्यात आलेली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी हे अमळनेरचे नेतृत्व करीत आहेत. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करुन स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘जय भवानी.. जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
डॉ.परिक्षित बाविस्कर हे एम.डी. (मेडिसीन) उच्चशिक्षित आहेत. सामाजिक जाण असून जळगाव शहरात वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. मूळचे अमळनेर येथील असल्याने शहरासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, नाट्य, ग्रंथ उत्सव, धार्मिक क्षेत्रात उज्ज्वल असे काम करण्याची ईच्छा आहे. अंबरीश टेकडीवर बाविस्कर परिवाराने २२ फूट उंचीची श्री हनुमंत राया ची भव्य मूर्ती, टेकडी वरील जिम उभारण्यात आपले समाजाप्रती योगदान दिले आहे. ‘सेवा हाच धर्म’ या प्रमाणे डॉ. परिक्षित बाविस्कर परिवाराने समाजसेवेचा वसा घेतला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून अमळनेर शहराचा विकास राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. प्रथमदर्शनी ते बाहेरचा उमेदवार असल्याचे बोलले जात होते. यावर डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी नुकतेच अमळनेर येथे शिवसेना तर्फे झालेल्या जाहीर सभेत मी स्वतः अमळनेरचा असल्याचे जनतेपुढे स्पष्ट केले. या सभेत खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गुलाबराव पाटील यांनी लाडक्या बहिणींची मोठी उपस्थिती असल्याने शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे बोलून दाखविले.