स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण ३० स्पर्धकांचा सहभाग

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : येथील साने गुरुजी विद्यालयात तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण ३० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्व कौशल्याची चुणूक दाखवली.
स्पर्धेसाठी ‘विधानसभेतील गुलाबराव’, ‘साने गुरुजींचा वैचारिक वारसा साथी गुलाबराव पाटील’, ‘साथी गुलाबराव पाटील: राजकीय प्रवास’, ‘मुलुख मैदानी तोफ: साथी गुलाबराव पाटील’ आणि ‘गुलाबरावांनी केले काय? जन आंदोलनात तुरुंगात पाय’ असे वैचारिक व अभ्यासपूर्ण विषय देण्यात आले होते.
दिमाखदार उद्घाटन व उपस्थिती…
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ऍड. अशोक बाविस्कर, संचालक भास्करराव बोरसे, मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील व मुख्याध्यापक संजीव पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले, तर मुख्याध्यापक प्रतिनिधी सुनील पाटील यांनी स्पर्धकांना नियमांची माहिती दिली.
अटीतटीची स्पर्धा व निकाल…
सर्वच स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणी केली. या स्पर्धेत परीक्षकाची जबाबदारी प्रा. अशोक पवार, वसुंधरा लांडगे व प्रा. शीला पाटील यांनी चोख बजावली. परीक्षकांच्या अंतिम निर्णयानुसार स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे राहिला:
- प्रथम क्रमांक: तपन प्रकाश पाटील
- द्वितीय क्रमांक: नेहा राकेश पाटील
- तृतीय क्रमांक: गौरीकांत धनराज बोरसे
परिश्रम व संयोजन…
स्पर्धेचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर व मुकेश पाटील यांनी केले. स्पर्धकांची नाव नोंदणी मुस्ताक शेख व जयेश मासरे यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्या पाटील, रवींद्र कोळी, देवेंद्र पाटील मोनाली वंजारी, दिपक सोनवणे, यशोदा महाले, गोपाल बडगुजर, कुणाल चौधरी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी स्पर्धकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.