धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांची जडणघडण करणे हा उद्देश

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लिलाधर पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. जयवंतराव पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मिनाक्षी इंगोले आदी उपस्थित होते. महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मिनाक्षी इंगोले यांनी प्रास्ताविक केले. देशभरात २४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लिलाधर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांची जडणघडण करणे हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘नॉट मी बट यू’ या भावनेतून प्रत्यक्ष समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य सुरू असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. मिनाक्षी इंगोले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!