स्विकृत नगरसेवक पदी मोहन सातपुते, गुलाब पाटील, प्रताप साळी, डॉ. डिगंबर महाले यांची वर्णी

अमळनेर : येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांचे नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाचे डॉ. परिक्षित बाविस्कर नवे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेत. अपक्ष नगरसेवक यांच्या साथीने बहुमत मिळवत सत्ता मिळवली. यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी नेमकी संधी कोणाला मिळणार ? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क होते. यावर काल दि.९ जानेवारी रोजी झालेल्या विशेष सभेत उप नगराध्यक्ष पदाचा मान ‘तुतारी’ ला मिळून अखेर पडदा पडला. राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्षातर्फे विजयी असलेले नगरसेवक प्रशांत मनोहर निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उप नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यासोबतच स्विकृत नगरसेवक पदी शिवसेना शिंदे गटाचे मोहन सातपुते, गुलाब पाटील असे दोन, अपक्ष गटाचे प्रताप साळी तर अमळनेेर तालुका व शहर विकास आघाडी कडून डॉ. डिगंबर महाले यांची निवड करण्यात आली. सभेचे पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी काम पाहिले. निवड कामी मुख्याधिकारी गणेश शिंदे व उपमुख्याधिकारी रविंद्र चव्हाण यांनी सहकार्य केले.

यावेळी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्ष व अपक्ष कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत डीजे च्या तालावर जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी माजी आमदार बी. एस. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, रविंद्र चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- अमळनेेरकर जनतेचा विश्वास..
- मी काहीतरी करु शकतो हा अमळनेेर कर जनतेचा विश्वास होता. त्याच विश्वासाने प्रथमच मिळालेल्या दुहेरी संधीचं सोनं करेन. शहराचा सर्वांगीण विकासाचे ध्येय राहील.… प्रशांत निकम, उप नगराध्यक्ष.

- शहर विकास व सुशासन साठी वचनबद्ध…
- खा. स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जयश्रीताई पाटील यांनी माझ्या निवडीसाठी प्रयत्न केल्याबद्दल कायम ऋणात राहू. नगरसेवक पदाची कारकीर्द सेवाभावी व अविस्मरणीय राहील. तसेच अमळनेर शहराचा विकास व सुशासन साठी मी वचनबद्ध आहे. …डॉ. डिगंबर महाले