अमळनेर शहरवासियांवर लादलेली अन्यायकारक कर वसुली संदर्भात अ. भा. ग्राहक पंचायत चे नगरपरिषदेकडे गाऱ्हाणे

लोकवर्गणी, पाणीपट्टी वरील व्याज व प्रॉपर्टी खरेदीदारावर लावला जाणारा कर रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी

अमळनेर : येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे काल दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर साहेब यांना शहरवासियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रथम अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर साहेब, स्विकृत नगरसेवक प्रताप अण्णा साळी व नगरसेवक प्राध्यापक रामकृष्ण पाटील यांचे बुके देऊन अभिनंदनही करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षापासून लोक वर्गणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कर वसुली करीत आहे. ही नागरिकांवर लादलेली कर वसुली अन्यायकारक व बळजबरीची आहे. लोकवर्गणी का आकारली जात आहे ? त्याचे कोणतेही सबळ कारण नगरपरिषदेकडे नाही. नगरपरिषद सन २०२४-२०२५ या वर्षापासून पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कात आर्थिक वर्ष ३१ मार्च अखेर असताना, ३१डिसेंबर पासूनच नागरिकांकडून बळजबरीने दोन टक्के दराने व्याज आकारत वसूली करीत आहे. नागरिकांमध्ये या बाबतीत तीव्र असंतोष आहे. तरी आपण पाणीपट्टीवरील आकारण्यात येणारे व्याज (Water Cess) रद्द करावा. तसेच प्रॉपर्टी खरेदी रकमेच्या दोन टक्के कर खरेदीदारांवर विनाकारण लावत आहे ते न्यायसंगत नाही असे आम्हास वाटते. अगोदरच खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी व इतर कर हे ग्राहकांकडून/ नागरिकांकडून सरकारद्वारे खरेदीचे वेळेस आकारले जात असतात. नगरपालिकेने फक्त नाव बदल करायचे आहेत त्यात कोणताही खर्च लागत नाही. तरी आपण हा कर का आकारत आहे ? त्याबद्दल स्पष्टीकरण नाही. नागरिकात याबद्दल असंतोष आहे तरी तो आपण त्वरित रद्द करावा असेही निवेदनात सूचित करण्यात आले आहे.

यापूर्वी दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांचे पदाधिकारी यांनी सदरचे निवेदन दिले असता ‘पुढील काळात कर वसुली करताना लोक वर्गणी व त्यावर २ टक्के व्याज आकारणी करणार नाही’ असे आश्वासन दिले होते. तथापि आजतागायात लोकवर्गणी व पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज आकारणी सुरु आहे. ती रद्द करणे बद्दल काहीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही म्हणून हे निवेदन आपणास देण्यात येत आहे. या निवेदनाचा विचार करुन आपले स्तरावर योग्य ते आदेश व्हावेत अशी विनंती वजा सूचना करण्यात आलेली आहे. याप्रसंगी अखिल भारतीय ग्रामपंचायत तर्फे अध्यक्ष सौ. स्मिता चंद्रात्रे, ॲड. सौ. भारती अग्रवाल, सौ. कपिला मुठे, सौ. वनश्री अमृतकर, सौ. ज्योती भावसार, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, सुनील वाघ, सतीश देशमुख सर, जयंतीलाल वानखेडे, श्री व सौ रजनी पाटील आदी उपस्थित होते. अशी माहिती सौ. मेहराज बोहरी यांनी दिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!