अमळनेर मतदार संघातून राष्ट्रवादीचे अनिलदादांचा झेंडा फडकला

महायुतीची पिछेहाट तर महाआघाडी वरचढ. निवडणूक निकालातून मतदानोत्तर चाचण्याही फेल.

अमळनेर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत मतदानोत्तर चाचण्या फेल ठरल्या. शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदानाचा सर्वाधिक टक्का परिवर्तन घडविण्यास कारणीभूत ठरला. अमळनेर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांनी भाजपाचे शिरीष चौधरी यांचा ८५९४ मतांनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला. अमळनेर तालुकावासियांनी भूमीपुत्राला साथ देत माथी लागलेला कलंक पुसून काढला हेच यातून स्पष्ट झाले आहे. अनिलदादांना पहिल्या फेरीपासूनच आघाडी मिळाल्याने महाआघाडीचे कार्यकर्ते आनंदात होते. निकाल आपलाच… हे लक्षात आल्यावर निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी अनिलदादांना खांद्यावर घेत अंगावर गुलाल उधळला. फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष केला. यावेळी कृषीभूषण साहेबराव पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत विजयोत्सव साजरा केला. यावेळी मोठा जनसमुदाय होता. पावसानेही विजयी मिरवणूकीत हजेरी लावली.

अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना एकूण १८५०१३ मतांपैकी मिळालेली मते याप्रमाणे… (१) अनिल भाईदास पाटील – ९३७५७ राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (घड्याळ) (२) अंकलेश मच्छिंद्र पाटील – ५२८ महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) ३) रामकृष्ण विजय बनसोडे (भैय्यासाहेब) – ४९८ बहुजन समाज पार्टी (हत्ती) (४) शिरीषदादा हिरालाल चौधरी – ८५१६३ भारतीय जनता पार्टी (कमळ) (५) श्रावण धर्मा वंजारी – १९०९ वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर) (६) अनिल (दाजी) भाईदास पाटील – १०६१ अपक्ष (कॅमेरा बोर्ड) (७) संदिप युवराज पाटील – ४८७ अपक्ष (शिट्टी) याशिवाय नोटा – १५०३ मतांचा समावेश आहे.

वरील आकडेवारीत टपाली मतदानात अनिल भाईदास पाटील – १०२३, शिरीष हिरालाल चौधरी – ९३९ तर सैनिकांचे टपाली मतदानात अनिल भाईदास पाटील ९३, शिरीष हिरालाल चौधरी १०३ मते मिळाली. सर्व मिळून अनिल भाईदास पाटील यांना ९३७५७ तर शिरीष चौधरी यांना ८५१६३ मते मिळाली.

विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील अकरा जागांवरील विजयी उमेदवारांत भाजपा – ४, शिवसेना – ४, काँग्रेस – १, राष्ट्रवादी – १, अपक्ष – १ जागेवर आहेत. यातील मतदारसंघातील विजयी उमेदवार असे… १) जामनेर – गिरीष महाजन (भाजपा) २) मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील (अपक्ष) ३) पाचोरा – किशोर पाटील (शिवसेना) ४) जळगांव शहर – राजुमामा भोळे (भाजपा) ५) जळगांव ग्रामीण – गुलाबराव पाटील (शिवसेना) ६) अमळनेर – अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी) ७) चोपडा – लताबाई सोनवणे (शिवसेना) ८) रावेर – शिरीष चौधरी (काँग्रेस) ९) चाळीसगाव – मंगेश चव्हाण (भाजपा) १०) पारोळा – एरंडोल – चिमणराव पाटील (शिवसेना) ११) भुसावळ – संजय सावकारे (भाजपा)

आपल्या विजयाबाबत बोलतांना अनिलदादा म्हणाले की, हा विजय अमळनेरला लागलेला कलंक पुसणाऱ्या कष्टकरी, शेतकरी, सर्व जाती धर्मातील तमाम जनतेचा आहे. कार्यकर्तेच नव्हे तर तमाम जनतेने कलंक पुसण्यासाठी श्रम घेतलेले आहेत. तमाम जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल मी शतश: आभारी असेल.

अमळनेर येथील जाहीर सभेत अमोल मिटकरी म्हणाले होते की, सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, खासदारच नव्हे तर जलसंपदा मंत्री असतांना देखील पाडळसरे धरणाचे काम एक इंचही होवू शकले नाही. बेरोेजगारी, गुंडागर्दी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, अवैध धंदे, कर्जमाफी, सिंचन योजना असे किती तरी प्रश्नांचा उलगडा केला होता. चित्रफीत द्वारे अवैध दारु, कापूस भाव वाढ उपोषण, पतंजली रुई बत्ती सारखे मुद्दे जनतेच्या निदर्शनास आणून दिले होते. स्थानिक आमदारांनी अमळनेर शहर बिकानेर करुन टाकले. पाचशे रुपयाने मत विकत घेवून अमळनेर तालुक्याला कलंक लावला. तालुक्यात बेरोजगारी, गुंडागर्दी, दारु तस्करी, वाळू तस्करी वाढली. सरकारने कलम ३७० रद्द केले ते केंद्रात मात्र तो राज्यातील शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत प्रश्न नाही. तसाच १५० कि.मी. वर राहणारा तुमचा नेता असूच शकत नाही. बाहेरच्या पार्सलला याच भूमीत गाडून भूमीपुत्र अनिल पाटील यांना निवडून द्या व अमळनेर तालुक्याला लागलेला हा कलंक पुसून काढा असे आवाहन केले होते.

अमळनेर येथील महायुती कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात शासन व मुख्यमंत्री साहेबांचे सर्वात जास्त प्राधान्य पाण्याला व विकासाला आहे. यामुळे विकासाला प्राधान्य दिले जाईल. अनेक वर्षांपासून रेंगाळलेला पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारण ३ वर्षे लागतील असे गिरीष महाजन यांनी सांगितले होते. यावर सरकारने पाच वर्षांत केले काय ? हा मुद्दा तालुक्यातील जनतेने लक्षात घेऊन भाजपला त्यांची जागा दाखवून दिली. यामुळे भविष्यात पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता अनिलदादांवर मोठी जबाबदारी आहे. या संधीचं ते सोनं करतील व जनतेच्या मनातलं स्थान कायम राखतील अशी अपेक्षा करु या.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!