नवनियुक्त गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांची विशेष उपस्थिती; विद्यार्थी व शिक्षकांशी हितगूज
अमळनेर : जि.प.शाळा, पिंगळवाडे येथे निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियान व शाळा प्रवेशोत्सव मेळावा नुकताच पार पडला. यानिमित्त अमळनेर तालुक्याचे नवनियुक्त गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियानाबाबत माहिती दिली. नवागतांचे स्वागत करुन पाठ्यपुस्तकांसह गणवेश वाटप केले. गुणवत्ता वाढी सोबत शिष्यवृत्ती व नवोदय सारख्या विविध स्पर्धा परिक्षांची तयारी बाबत उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन केले. तसेच गेल्या वर्षी शाळेतील इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड झालेल्या मयुरी पाटील या विद्यार्थीनीचा सत्कार केला. बाला उपक्रमांतर्गत ४३ मुद्द्यांवर विस्तार अधिकारी एल.डी.चिंचोरे यांचे समवेत ग्रा.पं.पदाधिकारी, ग्रामसेवक व शिक्षक यांचेशी चर्चा करुन राहिलेले निकष पुर्ण करणेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणेबाबत सुचविले.
शाळेत नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात तसेच निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियान, इ.१ लीत दाखलपात्र विद्यार्थ्यासाठी शाळापूर्व तयारी मेळावा क्र.२ व शाळा प्रवेशोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दखलपात्र विद्यार्थ्याची सजविलेल्या कार मधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच श्रीमती मंगला बाळासाहेब देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मेळावा भेटीसाठी आलेले पं.स.अमळनेर चे नवनियुक्त गटविकास अधिकारी विशाल शिंदे उपस्थित होते.व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सेल्फी पॉईंट व आकर्षक सजवलेली युवान कार. मेळाव्या मध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी सात प्रकारच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. यात प्रत्येक दखलपात्र विद्यार्थ्यांकडून विविध कृती करून घेण्यात आल्या. तशी नोंद त्यांच्या कृतीपत्रात घेण्यात आली. शालेय पोषण आहारात मिष्ठान्न भोजन देऊन नवागतांसह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा शुभारंभ दिवस खास ठरला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कल्पना पारधी, ग्रा.पं.सदस्य देविदास देशमुख, ग्रामसेवक विलास पाटील, शिक्षणप्रेमी राजेंद्र भिल, शा.व्य.समिती सदस्य योगेश सैंदाणे, भाका बारेला, अंगणवाडी सेविका जयश्री पाटील, शापोआ स्वयंपाकी सुशिला मिस्तरी, स्वयंसेवक विक्रम शेलार, ग्रामस्थ, पालक व शाळेतील आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना ठेंग यांनी तर सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले. संपुर्ण मेळावा यशस्वी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षिका वंदना सोनवणे तसेच मेळाव्यासाठी नियुक्त्त केलेले स्वयंसेवक माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन होवून मेळाव्याची सांगता करण्यात आली.