अमळनेर : विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्य पदी येथील निवृत्त सुभेदार मेजर नागराज पाटील यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. विभागीय आयुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी ही नियुक्ती दोन वर्षांकरिता केली आहे. या समितीत अजून चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात, समाजसेवक निवृत्ती कापसे (नाशिक), प्रा. डॉ. सुधाकर जाधव (साक्री- धुळे), पिरसिंग पाडवी (अक्कलकुवा- नंदुरबार), समाजसेवक नारायण झावरे (राहुरी- अहमदनगर) यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नागराज पाटील हे येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्ती बद्दल शिवशाही फाउंडेशन तर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ विज्ञान शिक्षक एस. ए. बाविस्कर, जी. पी. हडपे, ए. ए. वानखेडे, दिपककुमार पाटील, महेश बोरसे व शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे उपस्थित होते.
यावेळी श्री पाटील यांनी सांगितले की, लष्करातील निवृत्त अधिकाऱ्याला विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीत स्थान दिले ही माझ्यासारख्या लष्करी अधिकाऱ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देश सेवेनंतर आता खऱ्या अर्थाने समाजसेवा करता येणार आहे. समाजाला लागलेली कीड अर्थात भ्रष्टाचार कसा समूळ नष्ट करता येईल यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे. याबाबत समाज प्रबोधनही केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील,संस्थेच्या मार्गदर्शिका शिलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनिल गरुड, प्रशासकीय अधिकारी प्रा. शाम पवार, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी अभिनंदन केले आहे.