महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करणार ; पत्रकार परिषदेत वल्गना
काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

अमळनेर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी मेळावे झाले. त्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचार करत चाचपणी केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार ५ सप्टेंबर ला अमळनेेर येथे बुथ प्रमुखांचा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात तालुका काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक २ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे काही स्थानिक पदाधिकारी उपस्थित नव्हते. पदाधिकाऱ्यांमध्येच गटबाजी दिसून आल्याने पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करत स्पष्टीकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर आमचे तात्विक मतभेद असून पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार के. डी. पाटील, संदीप घोरपडे, सुलोचना वाघ, काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शांतारामबापू पाटील आहेत. महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार जाहीर करेल त्या उमेदवारासाठी आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे राहून एकदिलाने काम करणार असा विश्वास कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिला. याप्रसंगी मंचावर राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डी. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, वक्ता सेलचे अध्यक्ष संदीप घोरपडे, अमळनेेर शहर अध्यक्ष मनोज पाटील, अमळनेेर ग्रामीणचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई पाटील, गोकुळ बोरसे, अमळनेर काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सौ. नयनाताई पाटील आदी उपस्थित होते.
स्पष्टीकरण देताना मनोज पाटील म्हणाले की, किसान काँग्रेसचे प्रा. सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे व धनगर दला पाटील पक्षाच्या कार्यकारिणीला मानत नाहीत. यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या तालुका पदाधिकाऱ्यांमध्ये सरळ सरळ गटबाजी दिसून आली. ‘धरलं तर चावतंय… सोडलं तर पळतंय’ अशीच काहीशी स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची अवस्था दिसून आली. असे असूनही महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करणार अशी वल्गना पत्रकार परिषदेत करण्यात आली. हे सत्यात उतरेल का ? याचे खरे रुप येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्षात येईलच.
कोणत्याही पक्षाची काही ध्येय धोरणे असतात. तालुका स्तरावरुन जिल्हा स्तरावर व जिल्हा राज्यस्तरावर वरिष्ठ पातळीवर ते विषय कळवावे लागतात. किसान काँग्रेसचे प्रा. सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे व धनगर दला पाटील कुठलाही कार्यक्रम घेताना प्रोटोकॉल पाळत नाहीत. राष्ट्रवादीच्या बैठकीला जातात. पक्षाच्या स्थानिक समितीला माहीती देत नाहीत हे क्रमप्राप्त नाही. मी म्हणून अथवा तीन जण म्हणजे पक्ष नव्हे. पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसात मतभेद असू शकतात पण सर्व मतभेद बाजूला ठेवून पक्ष कार्याला प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. कोणतीही गोष्ट आम्हाला सांगितली आणि आम्ही सहभागी झालो नाहीत असे झालेले नाही. किसान आंदोलनातही आम्ही सहभागी झालो होतो. तरी त्यांनी वेगळी चूल मांडली. जर आम्ही सहभागी झालो नाही तर तो आमचा दोष असेल पण तसे होत नाही. आयडॉल कॉंग्रेसला वगळणं हेच चूकीचे आहे, ते पक्षालाच मानत नाही. त्यांना संघटनेची गरज नाही. स्थानिक संघटना डावलून पक्षाचे निरीक्षक आले असता इच्छुक म्हणून अर्ज दिले नाही. स्थानिक व जिल्हास्तरावर कोणतीही मागणी केली नाही. निरीक्षकांनी याबाबत तशी नोंद घेतली असून आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना तसे कळविले आहे. आम्ही पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ आहोत व राहू. आमची काही चूक असल्यास पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हास मान्य असेल असेही मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.
संदीप घोरपडे म्हणाले की, सध्या असलेले हे सरकार तीन चाकी आहे. तिघांनी तीन गावे दत्तक घेतली असेच दिसते. मुख्यमंत्री मुंबई, एक उप मुख्यमंत्री नागपूर तर दुसरा उप मुख्यमंत्री पुणे शिवाय बोलताना दिसत नाहीत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे. आंदोलने होऊनही जुनी पेन्शन चा प्रश्न अजूनही सुटत नाही. कमीशन खोरी करीत असल्याचे चित्र दिसते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ही कमीशनखोरी तून सुटला नाही. नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनात पाणी गळती होते असे कितीतरी उदाहरणे देता येतील. जनता हे सर्व जाणून असल्याने आता महाराष्ट्रातील जनता या सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. महिला संरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने नागपूर येथे नुकतेच आंदोलन केले. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मार्गदर्शनाखाली नारी न्याय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला डेंजर झोनमध्ये आहेत. झालेली महागाई, महिला अत्याचार अशा गोष्टी किती ही मोफत योजना दिल्या तरी लाडकी बहीण ते खपवून घेणार नाही. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एकनिष्ठता महत्वाची असल्याने आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहू असे सुलोचनाताई म्हणाल्या.
के. डी. पाटील म्हणाले की, मी घेतलेल्या सामाजिक जबाबदारीचे चीज झाले आहे. गरजूंना शैक्षणिक मदत केली. समाज कारणात कधी पैशांचा मोह ठेवला नाही. लोकप्रतिनिधी स्वत:ची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. एकाच झेंड्याखाली आम्ही सर्व मिळून निवडणूक लढविणार आहोत.
विकासासाठी उमेदवार म्हणून अजेंडा…
सद्यस्थितीत अनेक विषय मोडकळीस आणले जात असताना फक्त लढा देणं हाच पर्याय सध्या तरी आमच्या समोर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी उमेदवार म्हणून आपला अजेंडा काय असणार ? शहरातील रस्त्यांची दुरवस्था, महिला संरक्षणासाठी केलेली कामे काय ? अशा प्रश्नांना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा…
सुलोचनाताई पाटील… शेतकरी, युवक यांचे प्रश्न, महिलांना संरक्षण या मुद्द्यावर भर देणार असल्याचे सांगितले. यावर पत्रकारांनी दामिनी पथक असतांना कितीतरी अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून आपण किती वेळा आंदोलने केली ? तालुक्यातील किती महिला यात सक्रिय सहभागी आहेत ? असा प्रश्न पत्रकारानी उपस्थित केला. यावर जिल्हा स्तरावर सर्व महिला सातत्याने काम करीत असून तालुका स्तरावर १०० महिला काम करीत असल्याचे सांगितले.
के. डी. पाटील… मी राजकीय, शैक्षणिक ,सामाजिक कामाला प्राधान्य दिले आहे. गोरगरीब मुलांना फी मध्ये सवलत देऊन काही मुलांना दत्तक घेऊन समाजसेवा करण्याचा योग येतो या सारखा दुसरा आनंद नाही. पक्षाने उमेदवारी दिली तर पाडळसे धरण, औद्योगिक विकास, पाणीपुरवठा, शेतकऱ्यांना हमी भाव, शेत रस्ते, घटस्फोट रोखणे, शैक्षणिक विकास या मुद्द्यावर भर देणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी वेळप्रसंगी आंदोलने करु. घटस्फोटाचे प्रमाणात वाढ झाल्याने समुपदेशन करु. विधानसभा क्षेत्रात विविध शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध करुन देऊ अशी माहिती दिली. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर बोलताना सकारात्मक कामाला आमचा विरोध नाही. हुकूमशाही पुढे एकटं बोलणं योग्य वाटत नाही म्हणूनच महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधाला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो व जनतेचे प्रश्न मांडत आहोत.
संदीप घोरपडे… सौर ऊर्जेचा वापर करुन उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करु. आपल्याकडे चलनी पीके घेतली जातात. त्यात बदल करुन यशदाचे माध्यमातून मिश्र पीक कसे घेता येईल ?यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार. सरकार अनेक योजनांचा पाऊस पाडत असताना राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन साठी आंदोलन करत आहेत. आमचे सरकार सत्तेवर आल्यास राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार, महिला संरक्षण समिती मार्फत जनजागृती करण्यात येणार. विधानसभेचे तिकीट न मिळाल्यास मतदारांनी दिलेले दहा रुपये परत करणार असल्याचेही ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो व जनतेचे प्रश्न मांडत आहोत. लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून आला. महाविकास आघाडी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयी होणारच असा विश्वास कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शेवटी भागवत सूर्यवंशी यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले.