मौर्य क्रांती संघाचे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विचार विनिमय बैठकीत विविध विषयांवर चर्चा

अमळनेर : राजमाता अहिल्यामाई होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती साजरी होणार आहे. ३०० वी जयंती निमित्त येत्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मौर्य क्रांती संघाचे उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत यांच्या अध्यक्षतेखाली विचार विनिमय बैठक नुकतीच पार पडली. यात, अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनावर एकाचवेळी ३०० ठिकाणी व्याख्याने, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, अहिल्यामाई होळकर पुस्तकावर आधारित परीक्षा, महेश्वर दर्शन सहल, सांस्कृतिक कार्यक्रम, स्मरणिका प्रकाशन, पुरस्कार निवड, कर्तृत्ववानांचा सन्मान, अहिल्यामाईंच्या प्रतिमांचे वाटप आदी कार्यक्रमाबाबत चर्चा करुन या बैठकीत विविध समित्या गठीत करण्यात आल्या.
अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनावर एकाचवेळी ३०० ठिकाणी व्याख्यानांचे आयोजनासाठी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांची निवड करण्यात आली. निबंध स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख म्हणून शिवरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवश्री बापूराव ठाकरे, प्रा. अशोक पवार लिखित राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या पुस्तकावर आधारित परीक्षेचे प्रमुख म्हणून शिवश्री अशोक पाटील, महेश्वर दर्शन सहलीचे प्रमुख म्हणून दयाराम पाटील व एस. सी. तेले, ‘एक शाम अहिल्यामाई के नाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे समिती प्रमुख म्हणून भाऊसाहेब देशमुख व अजय भामरे, स्मरणिका प्रकाशन समितीचे प्रमुख म्हणून यमुनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी याप्रमाणे निवड करण्यात आली आहे.
विविध कार्यक्रमांत अहिल्यामाई यांच्या ३०० प्रतिमांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व समाजातील निवडक कर्तृत्ववान महिलांना अहिल्यामाई होळकर पुरस्कार आणि सर्व समाजातील कर्तृत्ववान पुरुषांना मल्हारराव होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राजमाता अहिल्यामाई होळकरांच्या माहेरचे वारसदारांना आणि मल्हारराव राजे होळकर यांच्या वारसदारांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते अहिल्यामाईंच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात तर समारोपप्रसंगी, लोककला, आदिवासी नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांत अहिल्यामाईंचे ऐतिहासिक तैल चित्रांचे आणि नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. अशा विविध माहितीयुक्त, वाचनीय कार्यक्रमांचे आयोजन वरील समितींच्या माध्यमातून केले जाणार आहे. बैठकीवेळी बन्सीलाल भागवत, प्रा. अशोक पवार, भाऊसाहेब देशमुख, अशोक बिऱ्हाडे, अशोक इसे , एस. सी. तेले, अशोक पाटील, भानुदास सैंदाणे, संजय सूर्यवंशी, दयाराम पाटील, बापूराव ठाकरे, अजय भामरे, मनोज मोरे आदी उपस्थित होते. वरील समित्यांमध्ये आवश्यकतेनुसार विस्तार करण्यात येणार आहे. सदर समित्यांमध्ये भाग घेऊ ईच्छिणाऱ्यांनी समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा. पुढील बैठक ही व्यापक स्वरुपात घेण्यात येणार असून सर्व सामाजिक, पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशतकी जयंती महोत्सव आयोजन समिती सदस्यांनी केले आहे.
