पोलीस प्रशासनाकडून गणेश विसर्जन व ईद सणावेळी मंगळग्रह सेवा संस्था व पत्रकार बांधवांनी केलेल्या उपक्रमाचे तसेच केलेल्या वृत्तांकनाचे झाले कौतुक

अमळनेर : संतांची व महापुरुषांची भूमी असलेले अमळनेर शांतच हवे अशी आमची अपेक्षा असून येणाऱ्या काळात आपले अमळनेर आपल्याला सांभाळायचे आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अमळनेर भूमीत गालबोट लागणे अशोभनीय असल्याची भावना डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांनी व्यक्त केली. अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे नुकतीच काल दि. २१ रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. सोबत पोलीस निरीक्षक विकास देवरे उपस्थित होते.
पोलीस प्रशासनातर्फे मंगळग्रह सेवा संस्था व पत्रकार बांधवांचे कौतुक व आभार !
- मंगळग्रह सेवा संस्थेने गणेश विसर्जन काळात सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना चहा, नाश्ता व सुरुची भोजनाची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. शिवाय निवासाची सोय उपलब्ध करुन दिली. याकामी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व सर्व टीम चे कौतुक केले.
- गणेश विसर्जन काळात मिरवणूक सुरळीत व्हावी यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य केले शिवाय गणेशोत्सव आणि ईद सणावेळी पत्रकार बांधवांनी संयम राखून वृत्तांकन केले. याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक श्री रेड्डी आणि अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी विशेष कौतुक केले असल्याचे सांगून पोलीस प्रशासनातर्फे सर्वांचे आभार मानले.
डीवायएसपी सुनिल नंदवाळकर म्हणाले की, पोलीस प्रशासन सज्ज आहेच तथापि, काही तरुण मुलांकडून होणाऱ्या चुका त्यांना भविष्यासाठी घातक आहेत. शहरातील एका तरुणाची एस.आर.पी.एफ मध्ये निवड झाली आहे. मात्र.. त्याचे नाव एका गुन्ह्यात असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र.. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मदतीने आम्ही यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत. परंतु प्रत्येक वेळी असे घडणार नाही, जे तरुण पोलीस भरती वा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत अशांनी यापासून दूर राहावे. अन्यथा त्यांचे भविष्यासोबत खेळ होणार आहे. याबाबत महाविद्यालय व अन्य ठिकाणी फिरुन आम्ही तरुणांशी चर्चा व प्रबोधन करीत आहोत. सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी यासाठी पुढे आले पाहिजे. येत्या काळात अमळनेर आपल्याला सांभाळायचे आहे एवढीच भावना प्रत्येकाने मनात ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करत पोलीस प्रशासनातर्फे कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाचे जनतेला आवाहन…
सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओ, मेसेज आदी बाबत खात्री करा. सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणाऱ्या अफवांना बळी पडून कायदा हातात घेऊ नका. आक्षेपार्ह माहिती शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. सोशल मीडिया वरील आक्षेपार्ह माहितीबाबत तात्काळ पोलीसांना कळवा असे पोलीस प्रशासनाच्या वतीने अमळनेेर शहर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी जनतेला आवाहन केले आहे.