एलसीबीच्या कारवाईनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित; मुख्य सूत्रधाराला संरक्षण तर दिले जात नाही ना ? कारवाई न झाल्यास जनआक्रोश मोर्चा व आमरण उपोषणाचा इशारा

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : शहरात ३ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणलेल्या कथित बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणात अद्यापही अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, अमळनेर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना सविस्तर निवेदन नुकतेच देण्यात आले. केवळ घटनास्थळी उपस्थित व्यक्तींवर कारवाई करून प्रकरण संपविण्याऐवजी संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून या व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, आर्थिक लाभार्थी, वाहतूक साखळी व संबंधित सर्व व्यक्तींना कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणातील कातड्यांचा साठा; स्वतंत्र गुन्ह्याची मागणी
ज्या ठिकाणाहून तीन जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली, त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशांच्या कातड्यांचा साठा आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कातड्यांचा स्वतंत्र पंचनामा करून जप्ती करण्यात यावी. त्यांचा उगम, वाहतूक, साठवणूक व संबंधित व्यक्तींची चौकशी करून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या कत्तलखान्याची चौकशी करण्याची मागणी
नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून गोवंशाची कत्तल होत असल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित कत्तलखाना, जबाबदार अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधित व्यक्तींवर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई करावी. तसेच कत्तलखान्यात कोणत्या प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी आहे, प्रत्यक्षात कोणत्या प्राण्यांची कत्तल केली जाते, त्याच्या नोंदी, तपासणी व देखरेख यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विश्व हिंदू परिषद -बजरंग दलाने या प्रकरणाच्या तपासासंदर्भात प्रशासनासमोर उपस्थित केलेले गंभीर प्रश्न
- एलसीबीने धडक कारवाई करून गुन्हा उघडकीस आणल्यानंतर पुढील तपास स्थानिक पोलिसांकडे का वर्ग करण्यात आला?
- एलसीबी स्वतः या प्रकरणाचा पुढील तपास करू शकत नव्हती का? तसे नसल्यास त्यामागील कारणे काय?
- घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती आणि नंतर दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीतील आरोपींच्या नावांमध्ये बदल का झाला?
- घटनास्थळी आढळून आलेल्या इतर संशयित आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना ‘परार’ का दाखविण्यात आले?
- या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात दिरंगाई का होत आहे?
- मुख्य सूत्रधाराला वाचविण्याचा अथवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे का ? या बाबींची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एक हजाराहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रखंड अध्यक्ष डॉ. संजय शाह, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, प्रखंड संयोजक सचिन महाजन, विजय पाटील यांच्यासह विश्व हिंदू परिषद -बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एक हजाराहून अधिक हिंदुत्वनिष्ठ नागरिक उपस्थित होते.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई केली नाही, चौकशीत दिरंगाई झाली किंवा दोषींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळल्यास विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा, आमरण उपोषण तसेच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.