मोकाट गुरे दिसल्यास थेट गोशाळेत रवानगी होणार !

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : शहरात मोकाट गुरे फिरण्याचे प्रमाण वाढत असल्याने येथील नगरपालिकेने मोकाट गुरे दिसल्यास थेट गोशाळेत रवानगी करण्याची कारवाई सुरू केली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. शहरात जागोजागी मोकाट गुरे फिरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ लागला होता. रस्त्यात गुरे बसत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन किरकोळ अपघात होत असत. भाजी बाजारात नागरिकांच्या मोटरसायकल ला लावलेल्या पिशव्यांमधील भाजीपाला खाणे, नागरिकांच्या घराच्या कंपाऊंड मध्ये घुसून झाडे खाणे, बाहेर वाळत टाकलेले धान्य, खाद्य पदार्थ खाऊन जाणे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी मोकाट गुरांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले असल्याने अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जितेंद्र चावरीया, सुनील संगेले, विशाल सपकाळे, चंदू बिऱ्हाडे, राज रामराजे, दर्शन बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी मोकाट गुरे वाहनात भरून गोशाळेत जमा करणे सुरू केले आहे.
मोकाट गुरांना गोशाळेत जमा केल्यानंतर तेथे त्यांना चारापाणी केला जाईल. मात्र गुरे मालकांना गुरे परत हवी असल्यास जितके दिवस गुरांचे पालन पोषण केले जाईल तितक्या दिवसांचा खर्च गोशाळेला दिला जाईल आणि नगरपालिकेचा वेगळा ५०० रुपये दंड आकारला जाईल. यामुळे गुरे मालकांनी आपापली गुरे घरी अथवा गोठ्यात बांधून ठेवावीत, रस्त्यावर गुरे फिरताना आढळल्यास गुरे जमा केली जातील. विनाकारण भुर्दंड भरण्यापेक्षा सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही म्हणून शिस्तीचे पालन करावे असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.