
अमळनेर : अखिल भारतीय साहित्य अकादमी, दिल्ली चे ४० वे राष्ट्रीय संमेलन दि. ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे पार पडले. देशातील प्रत्येक राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन संमेलनात गौरविण्यात येते. दिल्ली येथील अखिल भारतीय साहित्य अकादमीने अमळनेेर येथील पत्रकार प्रा. डॉ. विजय गाढे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत खान्देशातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप -२०२४’ पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. गौरवपत्र, सुवर्ण पदक, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. पी. सुमनाक्षर, राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर, प्रोफेसर रतन लाल सोनागरा (अध्यक्ष स्वागत समिती), तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तथा माजी मंत्री संघप्रिय गौतमजी यांसह अनेक आजी, माजी मंत्री उपस्थित होते.
मला मिळालेल्या या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढलेली आहे. बहुजन समाजातील समस्याग्रस्त लोकांसाठी मी यापुढील जीवन व्यतीत करण्याचे ठरविले आहे. आपल्या धारदार लेखणीने बहुजनांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने चालू ठेवणार.
…प्रा. डॉ. विजय गाढे
प्रा. डॉ. विजय गाढे पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते असून खान्देशात शिव- फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांची अग्रणी भूमिका असते. त्यांना ग्रंथालय शास्त्र विषयात विद्यावाचस्पती ही पदवी मिळालेली आहे. समाजात जातीय तेढ, धर्माधर्मात विषमता वाढत चाललेली आहे. त्यावर बाबासाहेबांच्या संविधानाचा योग्य वापर केल्याशिवाय ती समस्या मिटणार नाही. समाजातील उच्च निचतेला फाटा देण्यासाठी समानतेचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येऊन अन्याया विरोधात लढा उभारला पाहिजे, या विचाराने समाजातील दुही संपविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गाढे यांनी म्हटले आहे. आपल्या लेखणीतून ते अनेक विषयांवर लेखन करीत असतात. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ देण्यात आला आहे. विजय गाढे यांनी हा पुरस्कार आपली आई कालकथीत तुळसाबाई व वडील कालकथीत शालिग्राम यांना समर्पित केला.
दैनिक देशोन्नती चे जिल्हा संपादक मनोज बारी, उपसंपादक सुनिल भावसार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, महासचिव डॉ. विश्वास आरोटे, राज्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायासाकडा, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान मैराळे, साहित्य अकादमीचे जिल्हा उपाध्यक्ष चिंधु वानखेडे यांचेसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विजय गाढे यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!