क्रांतीपर्व स्मारकाचे लोकार्पण होईपर्यंत ‘अमळनेेर ते डांगरी’ स्वातंत्र्य लढा पदयात्रा स्थगित; प्रगणे डांगरी ग्रामस्थांच्या विनंतीला मान

पदयात्रा स्थगित मात्र.. स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींचा विचार गावागावात पोहोचवून प्रेरणा मिळावी यासाठी तालुक्यात इतरत्र पदयात्रा निघणारच : गितांजली संदीप घोरपडे


अमळनेर : तालुक्यातील जनतेने एकत्र येऊन लोकार्पण सोहळा भव्य दिव्य व्हावा, कार्यक्रमाला चांगले स्वरूप यावे. या उद्देशाने दि.२६ एप्रिल रोजी होणारी स्वातंत्र्य लढा पदयात्रा काढू नये अशी विनंती साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात काल झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रगणे डांगरी येथील ग्रामस्थ प्रतिनिधी मंडळाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मंचावर डॉ.उत्तमराव पाटील यांचे पुतणे प्रशांत शांताराम शिसोदे, डांगरी गावचे माजी सरपंच अनिल शिसोदे, दिपक शिसोदे उपस्थित होते. सोबत पदयात्रा आयोजन समितीचे गितांजली घोरपडे, बी. के. सूर्यवंशी, संदीप घोरपडे होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे व त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी क्रांतीवीरांगणा लिलाताई उत्तमराव पाटील यांच्या प्रगणे डांगरी या गावापर्यंत अमळनेर येथून दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी स्वातंत्र्य लढा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांचा हेतू अतिशय शुद्ध असून ते समाजवादी पुरोगामी विचाराचे आहेत. लिलाताई आणि डॉ. उत्तमरावांच्या कार्यकर्तुत्वाचा प्रचार, प्रसार करीत आहेत. यावर प्रगणे डांगरी येथील माजी सरपंच अनिल शिवदास सिसोदे यांनी ‘गावकऱ्यांच्या भावना तुमच्या सोबत असून पदयात्रेचे स्वागत करणे आमचे कर्तव्य आहे. ज्यांच्या डोक्यातून स्मारक उभे राहावे अशी सुरेख कल्पना सुचली त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. मात्र.. स्मारकाच्या अनधिकृत लोकार्पणावरून मत मतांतरे झाली, संघर्षाची ठिणगी पडली. प्रसार माध्यमातील माहितीनुसार होणारी तू तू… मै मै पाहता आपण आमच्या विनंतीला मान द्यावा. तालुक्यातील जनतेने एकत्र येऊन लोकार्पण सोहळा भव्य दिव्य व्हावा, सर्वांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाला चांगले स्वरूप यावे अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. जेणेकरून यात यात कोणतेही राजकारण येणार नाही, वाद होणार नाही. अमळनेर नगरपालिकेकडून अधिकृतपणे क्रांतीपर्व स्मारकाच्या लोकार्पणानंतर पुढे काही दिवसांनी भव्य अशी पदयात्रा काढून त्या पदयात्रेचे जोरदारपणे स्वागत आम्ही करु. यासाठी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने आपणासमोर आलेलो आहोत. २६ एप्रिल रोजी आयोजिलेली पदयात्रा तूर्त स्थगित करावी’ अशी विनंती त्यांनी आयोजकांना केली. स्मारकाचे लोकार्पण संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. लोकार्पण कोणी करावे ? हा प्रशासनाचा भाग आहे. मात्र दिलेल्या अल्टीमेटम नुसार लोकार्पण न झाल्यास त्याचे पडसाद उमटतील असेही ते म्हणाले.

स्वातंत्र्यलढा पदयात्रेच्या आयोजन समितीतील संदीप घोरपडे म्हणाले की, आम्ही डांगरी ग्रामस्थ व पत्रकार बांधवांचे लिलाताईंच्या नावाने बांधलेल्या इमारतीत तसेच पत्री सरकारच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या चिमठाणा खजिना लुटीतील सेनानींच्या स्मारकामध्ये स्वागत करतो. अमळनेेर तालुक्याला क्रांतीकारकांचा ईतिहास आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्यगाथा जवळून समजून घेण्याची गरज आहे. क्रांतिकारकांचे पुतळे झाकून का ठेवले ?ज्यांनी स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना श्रेय मिळालेच पाहिजे या मताचा मी आहे, ते नाकारण्याचा प्रश्नच नाही. तेदेखील पुरोगामी विचारांचे आहेत. आमचा राग नगरपालिका प्रशासनावर होता व आहे. ज्यांनी क्रांती घडवून आणली अशा थोर क्रांतीकारकांचे पुतळे अनेक दिवसांपासून झाकून ठेवण्यात आले होते ते आम्हाला पहावले न गेल्याने आम्ही खुले केले. थोर पुरुषांसाठी क्रांती करावी लागते. मी लिलाताई आणि डॉ.उत्तमराव पाटील यांचा अनुयायी आहे. मी साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा आहे. मी महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा जीवनात वापर करणारा सेवक आहे. आणि म्हणून मधल्या काळात मला आलेल्या फोनवर जी चर्चा झाली. त्यांना मी सांगितले की, मी लिलाताईंचे स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींचे विचार सांगण्यासाठी गावोगावी फिरणारच. आपण निषेध करा, शिव्या घाला, प्रसंगी मारा. परंतु आम्ही जे समाज हिताचे आहे ते कार्य करीत राहणार. अहिंसक आहोत याचा अर्थ आम्ही भित्रे नाहीत, आम्ही निर्भय आहोत. आम्ही कोणाला शत्रू मानत नाही, कोणाचा द्वेष करीत नाही. आम्ही शत्रूचा देखील सन्मान करतो, शत्रूला देखील प्रसंगी मदत करतो त्यामुळे आम्ही कोणाशीही वाद घालत नाही. आम्ही कोणावर वैयक्तिक टीका करीत नाही. आमची जीभ कितीही कठीण प्रसंग आला तरी घसरत नाही. सत्यशोधक पध्दतीने आमचा विवाह झाला आहे. मी सामान्य सेवक असून अहिंसावादी आहे. डांगरी गावाला एक ईतिहास आहे. या गावाशी आपुलकीचं नातं आहे तथापि, डांगरी येथील काही ग्रामस्थांनी क्रांतीपर्व स्मारकाचे दिमाखात लोकार्पण होऊन मगच पदयात्रा काढावी अशी विनंती केली आहे. गावकऱ्यांच्या भावनेचा आदर करून आम्ही डांगरीची पदयात्रा डांगरीकर सांगतील तेव्हाच निघेल. मात्र, तालुक्यात इतरत्र पदयात्रेचा धमाका सुरु राहील. क्रांतीपर्व पुस्तकाच्या प्रती शिल्लक नाहीत. आहेत त्या प्रती जीर्ण झाल्या आहेत. तो क्रांतिकारकांचा ईतिहास जनतेला, नव्या पिढीला कळावा हा आमचा हेतू आहे. नगरपालिका मुख्याधिकारी यांनी यात लक्ष देऊन क्रांतीपर्व स्मारकाचे लोकार्पण लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.

  • होय, … मी आहे मणीधारी नागोबा..!
  • मी आयत्या बिळात नागोबा असल्याची काहींनी वैयक्तिक टिप्पणी केली याची खंत मनात आहेच. त्यावर प्रतिउत्तर दिले नाही. मनातील खंत व्यक्त करताना संदीप घोरपडे म्हणाले की, मी नागोबा असलो तरी विषधारी नाग नाही… मणीधारी नाग आहे.. इतरांना प्रकाश देतो. सानेगुरुजी शाळेच्या हॉलमध्ये थोर स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृती जपत आहोत. सानेगुरुजी शाळेत कॉपी होऊ नये यासाठी ठाम भूमिका घेतली. आज ४० वर्षाच्या प्रवासात अत्यंत बिकट परिस्थितीत पुज्य साने गुरुजी शाळा नावारुपाला आणली. शाळेत मागील २५ वर्षापासून परिक्षेत कॉपी होत नाही. यामुळे शाळेतून शिकून गेलेली माणसे प्रामाणिकपणे आपले जीवन जगतात. जनतेच्या कराच्या पैशातून निर्माण झालेल्या क्रांतीपर्व स्मारक गेटचे कुलूप तोडून धुळखात कापडात बांधून ठेवलेले थोर क्रांतीकारकांचे पुतळे जनतेसाठी खुले केले यात वावगे काय ? सांस्कृतिक क्षेत्रात सतत कार्यरत असतो. २६ वर्ष नाट्यगृहाच्या उभारणीसाठी खर्च केले. वेळोवेळी आवश्यक पत्रव्यवहार करुन नऊ वर्ष पडून असलेले नगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह जनतेसाठी खुले केले. एसी कुलींगसाठी स्वतः पदरमोड करुन ६० लाख रुपये खर्च केला. परंतु कोणी आमचा उदो -उदो करावा, त्या नाट्यगृहाच्या लोकार्पणात मला संधी द्यावी किंवा माझ्या नेत्याच्या हस्ते त्याचे उद्घाटन करावे असा अट्टाहास मी कधी केला नाही व कधी करणार नाही. मी प्रामाणिकपणे काम करतो आणि पुढे चालतो. माझा प्रवास निरंतर चालूच राहणार तो देखील अहिंसक मार्गाने. विधायक कामासाठी पदरमोड करत राहणार.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य गितांजली घोरपडे म्हणाल्या की, आम्ही वर्षानुवर्ष पत्री सरकारातील सेनानी उत्तमराव पाटील यांचा परिचय शाळेतील विद्यार्थ्यांना करून देतो. हा विचार महिला, तरुण यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग म्हणून मी पदयात्रेचे नेतृत्व करीत होते. गावकऱ्यांच्या प्रामाणिक भावनांचा विचार करता स्मारकाचे लोकार्पण होईपर्यंत ‘अमळनेेर ते डांगरी’ पदयात्रा स्थगित राहील. स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी लिलाताई व डॉ.उत्तमराव नानांचा विचार गावागावात पोहोचवून प्रेरणा मिळावी यासाठी तालुक्यात पदयात्रा निघणारच असेही स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन अमळनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी केले. अनिल शिसोदे यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!