सहाव्या दिवशी आश्वासन मिळाल्याने निम्न तापी प्रकल्प कार्यालया समोर शेतकऱ्याने सुरु केलेल्या उपोषणाची सांगता

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या कार्यालयाकडून मंत्री यांचे दालनात सदर प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन

अमळनेर : येथील कार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प कार्यालयासमोर संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आमरण उपोषणास बसलेल्या ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या कार्यालयाकडून मंत्री यांचे दालनात सदर प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन मिळाल्याने मान्यवरांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. गेल्या ३० वर्षांपासून अप्पर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा पारदर्शक व पूर्ण मोबदला मिळावा यासाठी हातेड खुर्द, बुधगाव, अनवर्दे खुर्द शिवारातील शेतकरी पाठपुरावा करत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने या सर्व शेतकऱ्यांच्यावतीने शेतकरी उमराव भाऊराव बोरसे हे १० सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसलेले होते. सदर प्रश्नी कोणत्याही प्रकारची हालचाल प्रशासनाकडून होत नसल्याने निम्न तापी प्रकल्प कार्यालय परिसरात उपोषणकर्ते शेतकऱ्याच्या समर्थनार्थ चोपडा तालुक्यातील अनवर्दे व परिसरातील गावांचे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचे उद्देशाने गर्दी केली होती.

याप्रसंगी कार्यकारी अभियंता य. म. कडलग यांनी आंदोलन कर्ताच्या मंडपात बसून आंदोलनकर्ते यांचेसोबत सदर प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे ,सरपंच सुनिल पाटील, महेश पाटील यांचेसह वाळकी येथील मा. जि. प. सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील यांनी यावेळी विविध अधिकाऱ्यांशी संपर्क करून सदर प्रश्नावर कायदेशीर बाजू समजून घेतली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे कार्यालयाशी संपर्क केला असता, संबंधित मंत्री महोदय यांचे दालनात उपोषणकर्ते शेतकरी यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक लावून सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना मिळाले. यामुळे उपोषणकर्ते उमराव बोरसे यांनी माजी जि. प. सदस्य सुनिल पाटील, पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन निम्न तापी प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री कडलग व त्यांचे सहकारी अधिकारी यांचे उपस्थितीत उपोषण सोडले. उपोषण स्थळी युवा कार्यकर्ते उर्वेश साळुंखे, गुलाबराव बोरसे, मनिषा बोरसे ,रेखाबाई बोरसे, कविता बोरसे, जगतराव बोरसे, श्रीराम बोरसे, सुनील बोरसे, महेश बोरसे, रविंद्र बोरसे, धनंजय साळुंखे, नाना तिरमले, शुभम तिरमले, महेश पवार, शशिकांत बोरसे, अरुण बोरसे, शरद नन्नवरे, पांडुरंग बोरसे यांचेसह अन्यायग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!