विधानभवनात आमदार अनिल पाटील यांनी वेधले शासनाचे लक्ष; तीर्थक्षेत्र विकास योजनेत संस्थानचा समावेश व्हावा.

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : उत्तर महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान, आध्यात्मिक प्रेरणास्थान असलेल्या अमळनेर येथील ‘प्रति पंढरपूर’ असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान मंदिराचा २५० वर्षांचा ऐतिहासिक लाकडी गाभारा दिनांक १ जुलै रोजी आगीत भस्मसात झाला आहे. गाभाऱ्याचे प्राचीन वैभव राखेत परिवर्तित झाले. मात्र, श्रींच्या कृपेने मंदिरातील देवस्थान सुरक्षित राहिले, हीच भाविकांसाठी दिलासादायक बाब आहे. श्री संत सखाराम महाराजांचा हा आध्यात्मिक वारसा संपूर्ण महाराष्ट्राची अमूल्य सांस्कृतिक संपत्ती आहे. या पवित्र वारशाचे जतन, संवर्धन आणि पुनरुत्थान करणे ही शासनासह समाजाचीही नैतिक जबाबदारी आहे.
या अत्यंत वेदनादायी घटनेची गांभीर्याने दखल घेत, आज आमदार अनिल पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. मंदिराचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान, लाखो भाविकांची श्रद्धा आणि वाडी संस्थानचे धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, या पवित्र स्थळाची पुनर्बांधणी युद्धपातळीवर करण्याची ठाम मागणी सभागृहात केली.
अमळनेरचे वाडी संस्थान हे “प्रति पंढरपूर” म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येत्या २५ जुलैच्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी व भाविक येथे श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करून, पर्यटन विकास विभागामार्फत तीर्थक्षेत्र विकास योजनेत या संस्थानचा समावेश करण्यात यावा आणि त्यासाठीचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करण्यात यावा. लाखो भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत वाडी संस्थानचे पुनरुत्थान अत्यंत वेगाने आणि भव्य स्वरूपात व्हावे अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी सभागृहात केली.
शासन नक्कीच सकारात्मक भूमिका घेईल : मुख्यमंत्री
आमदार अनिल पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंदिर पुनर्बांधणीसाठी १५ कोटींचा निधी विशेष बाब म्हणून तातडीने मंजूर करण्याची विनंती केली. यावर मा.मुख्यमंत्र्यांनी शासन नक्कीच सकारात्मक भूमिका घेईल अशी ग्वाही दिली.