डॉ. दीपक पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : तालुक्यातील सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अडीच दशकांहून अधिक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाने तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी माजी पं. स. सभापती तथा शिवसेना अमळनेरचे माजी संघटक डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात, सात्री गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे सात्री गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाने जमीन संपादित केली होती. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जागा घेतली असली तरी अडीच दशकांहून अधिक वर्षांनंतरही अनेक कुटुंबांना घरांसह मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह…
दिनांक २७ मे २०२२ रोजीच्या पत्रानुसार वाटप प्रक्रिया स्थगित करुन पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अद्याप सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने आता पुन्हा नवीन सर्वेक्षण कशासाठी ? असा प्रश्न डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे
याशिवाय सात्री गावाच्या पुनर्वसना सोबतच पांझरा नदीवर मांडळ, मुडी आणि शहापूर येथे बंधारे उभारुन नदीतील पाणी अडविण्यात यावे अशी मागणी केली आहे. साहजिकच परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊन पाणीटंचाई दूर होईल. पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होईल. शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी लाभ होईल. याबाबत जलसंपदा विभाग जळगाव यांच्याकडून सर्वेक्षण करुन प्रस्तावित कामांना गती देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.