
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय, एकाग्रता आणि वाचनाची आवड वाढावी, तसेच मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून काही काळ दूर राहता यावे, या उद्देशाने अमळनेर PTA क्लासेस संघटने तर्फे अमळनेर शहरात ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.
या उपक्रमासंदर्भात PTA पदाधिकाऱ्यांनी अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम तसेच शिक्षण सभापती नाविद शेख यांची भेट घेऊन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या अभिनव संकल्पनेचे दोन्ही मान्यवरांनी स्वागत करुन सकारात्मक प्रतिसाद दिला. अमळनेर नगर परिषद व PTA क्लासेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच हा उपक्रम कार्यान्वित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीपासून दूर राहून केवळ अभ्यास, वाचन आणि ज्ञानार्जनासाठी वेळ द्यावा, अशी संकल्पना आहे. सायंकाळी ७ वाजता विशेष सायरन वाजवून संपूर्ण शहरातील विद्यार्थ्यांना ‘अभ्यासाची वेळ सुरु झाली’ असा संदेश देण्याची कल्पना आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्यामध्ये स्व-अनुशासन, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची सकारात्मक सवय निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. हा उपक्रम केवळ PTA किंवा नगर परिषदेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण अमळनेर शहराने स्वीकारलेली शैक्षणिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ‘दोन तासांचा छोटासा संकल्प; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी चळवळ !’ या विचारातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत असून, अमळनेर शहराने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी एक आदर्श निर्माण करावा, असा मानस PTA पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या भेटीप्रसंगी PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, सौ. सुरश्री वैद्य, सुधीर टाकणे, सौ. वैशाली निकम, मयूर भावसार, स्वर्णदीप राजपूत आदी PTA पदाधिकारी उपस्थित होते.