तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे गावालगत असलेल्या गाव तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. या घटनेने संपूर्ण खवशी गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत विरेंद्र उर्फ विरु अण्णा तलवारे (वय ७) आणि त्यांचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (वय ३२) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विरु हा सकाळी तलावाजवळ खेळत असताना अचानक पाण्यात उतरला. मुलगा पाण्यात उतरल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी वडील अण्णा यांनीही तलावात प्रवेश केला. मात्र, तलावात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने दोघेही गाळात अडकले. स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने बाप-लेकाचा मृत्यू झाला. मृत अण्णा तलवारे व त्यांचा मुलगा विरु हे मूळचे आर्वी, ता. जि. धुळे येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या खवशी, ता. अमळनेर येथे आपल्या सासरवाडीत वास्तव्यास होते. बाप-लेकाच्या अकाली निधनाने एका कुटुंबावर मोठा आघात झाला असून, खवशी गावावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
तलाव परिसर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तलावाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.