साने गुरुजींच्या कर्मभूमीत त्यांच्या विचारांना साजेसे स्मारक उभारण्यात यावे; सराफ सरांच्या शोकसभेत सूर

निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे साने गुरुजींचे स्मारक रखडले : ॲड. ललिता पाटील


(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नाव म्हणजे प्रा. डॉ. ए. जी. सराफ सर. नुकतेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. साने गुरुजी स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रश्न सातत्याने जिवंत ठेवला. त्यांच्या निधनानंतर नुकतीच शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
शोकसभेत ॲड. ललिता पाटील यांचे मनोगत अमळनेरच्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले. ‘निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे साने गुरुजींचे स्मारक होऊ शकले नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून साने गुरुजींचे स्मारक व्हावे अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र, हा विषय अद्याप प्रत्यक्ष कृतीत आला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी शोकसभेला सराफ सरांवर प्रेम करणाऱ्या अनेकांची उपस्थिती होती.

साने गुरुजी हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. ज्या भूमीत त्यांनी आपले कार्य केले, त्या अमळनेरमध्ये त्यांच्या स्मृतींना साजेसे स्मारक उभे राहणे ही केवळ भावनिक अपेक्षा नाही, तर अमळनेरच्या इतिहासाशी आणि अस्मितेशी जोडलेली बाब आहे. त्यामुळे या विषयासाठी आता केवळ बैठका, चर्चा आणि आश्वासने पुरेशी नाहीत. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शासनदरबारी ठोस पाठपुरावा करावा, आवश्यक प्रस्ताव तयार करून घ्यावा आणि शासनाकडून स्मारकासाठी निधी आणावा, अशी अपेक्षाही अमळनेेरच्या जनतेच्या वतीने ॲड. ललिता पाटील यांनी व्यक्त केली.

साने गुरुजींच्या स्मारकाचे स्वप्न.. हीच खरी श्रद्धांजली !

सराफ सरांना खरी श्रद्धांजली पुष्पहार अर्पण करण्यात नाही; तर त्यांनी जपलेले साने गुरुजींच्या स्मारकाचे स्वप्न पूर्ण करण्यात आहे. साने गुरुजींच्या कर्मभूमीत त्यांच्या विचारांना साजेसे स्मारक उभे करावे अशी अमळनेर येथील जनतेची अपेक्षा आहे. साने गुरुजींच्या स्मारकाचे स्वप्न हीच सरांना खरी श्रद्धांजली ठरेल !

विशेष म्हणजे, सराफ सरांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर साने गुरुजींच्या स्मारकाचा विषय ज्या तळमळीने जपला, त्याच विषयावर त्यांच्या शोकसभेत पुन्हा आवाज उठणे हा योगायोग नाही. उलट, सराफ सरांच्या जाण्याने थांबलेला नव्हे, तर अधिक जोमाने पुढे नेला जाणारा लढा असावा, असा संदेशच या मनोगतातून मिळतो. स्मारक म्हणजे केवळ एक वास्तू उभी करणे नव्हे. साने गुरुजींच्या विचारांचे दर्शन घडवणारे, त्यांच्या कार्याची प्रेरणा देणारे आणि नव्या पिढीला माणुसकी, शिक्षण, त्याग व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे प्रेरणास्थळ उभे राहणे अपेक्षित आहे. आज प्रश्न केवळ “साने गुरुजींचे स्मारक कधी होणार?” एवढाच नाही. प्रश्न हा आहे की— साने गुरुजींच्या कर्मभूमीला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का ? शासनाकडून निधी आणण्यासाठी ठोस प्रयत्न होणार का ? आणि प्रा. डॉ. ए. जी. सराफ यांनी जपलेले हे स्वप्न त्यांच्या पश्चात प्रत्यक्षात आणले जाणार का ? असे काही प्रश्न उपस्थित केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!