एक विलक्षण अनुभव.. अविरत काम करणाऱ्या सगळ्या देवदूतांसाठी जनतेत अमाप कृतज्ञता दाटली. जनतेने थाळीनाद व टाळ्यांच्या आवाजात मानले आभार.
अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, कोरोना या विषाणूच्या संसर्गाचा एकजुटीने सामना करण्यासाठी रविवार ता.२२ रोजी सकाळी जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. जनतेचा शहर व तालुक्यातून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत जनतेचे संचारबंदी स्वयंपूर्णता असेल असे पंतप्रधानांनी सांगितले होते. सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. यात प्रशासनाचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे ठरले. सायंकाळी पाच वाजता जनतेने थाळीनाद व टाळ्यांच्या आवाजात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाचे व सीमेवर आपले रक्षणासाठी कार्यरत असलेल्या सैनिकांचे आभार मानले. यात लहान बालकांच्या ही सहभाग होता. शिवतेज शिंदे या लहान बालकानेही थाळी वाजवून प्रशासनाचे आभार मानले.

विलक्षण अनुभव होता.. म्हटलं तर काही मिनिटं टाळ्या वाजवून किंवा वाद्य किंवा इतर साधनांनी नादनिर्मिती करायची होती. पण हे एवढंच नव्हतं.. टाळ्या वाजवताना, घंटानाद करताना संमिश्र भावना उमटत होत्या. करुणा, प्रार्थना, निसर्गासमोर शरणागती, कृतज्ञता..! आणि मनाच्या खोल गाभाऱ्यातून त्या जगतनियंत्याकडे आपसूकच प्रार्थना उमटली. व्याधीग्रस्त रुग्णांना बरं कर, ज्या कुटुंबात मनुष्यहानी झाली आहे त्यांना यातून सावरायला बळ दे, सर्वांचं रक्षण कर, सर्वांना चांगलं आरोग्य दे, या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांना बळ दे, चांगली बुद्धी दे.. आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी अविरत काम करणाऱ्या सगळ्या देवदूतांसाठी अमाप कृतज्ञता दाटली. कधी नव्हे तेवढा वेळ परिवार एकत्र राहण्याचा आनंद सर्वांनीच अनुभवला. अमळनेर शहरच नव्हे तर ग्रामीण भागात शुकशुकाट दिसत होता. जनता कर्फ्यू साठी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे, अमळनेर येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
तहसीलदार यांचे आवाहन…
आजचा जनता कर्फ्यू उद्या ता.२३ मार्च २०२० पहाटे ५ वाजे पर्यंत चालू राहणार आहे. ता.२३ मार्च २०२० ला पहाटे ५ वाजे पासून नगरपरिषद व नगरपंचायत (नागरी भागात) क्षेत्रात कलम १४४ लागू होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व गावांमध्ये कोतवाल यांचे मार्फत दवंडी द्यावी. सर्व तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर यांनी गावात प्रसिद्धी द्यावी असे आवाहन अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
