अमळनेरला लागलेला कलंक पुसून अनिलदादा बहुमतांनी विजयी होणार : अमोल मिटकरी
अमळनेर : तालुक्याचा स्वाभिमान राखण्यासाठी राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेला झालेली हाऊसफुल गर्दी अमळनेर तालुक्याला लागलेला कलंक पुसून अनिलदादांना बहुमतांच्या फरकाने विजयी करणार असा आत्मविश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. येथील ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ ता.१० रोजी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस अमोल मिटकरी, ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजीभाई, ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, तिलोत्तमा पाटील, जयश्री पाटील, गोकुळ बोरसे, मनोज पाटील, संदीप घोरपडे आदि पदाधिकारी होते.
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महामानवांना अभिवादन करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी आपल्या दमदार शैलीत भाषणास सुरुवात केली. शिवतिर्थ मैदानावरील उध्दवजींची सभा, भगवानगड नंतर सावरगाव येथील सभा, जत सांगोल्यातील अमित शाह यांच्या सभांना फिके पाडणारी अमळनेरची ही सभा बापसभा असून हवेची दिशा बदलणारी सभा आहे. भाजपा सरकारने पाच वर्षात केले काय ? असा सवाल करीत त्यांनी आपली तोफ डागली.
अमोल मिटकरी म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, खासदारच नव्हे तर जलसंपदा मंत्री असतांना देखील पाडळसरे धरणाचे काम एक इंचही होवू शकले नाही. बेरोेजगारी, गुंडागर्दी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, अवैध धंदे, कर्जमाफी, सिंचन योजना असे किती तरी प्रश्नांचा उलगडा त्यांनी केला. चित्रफीत द्वारे अवैध दारु, कापूस भाव वाढ उपोषण, पतंजली रुई बत्ती सारखे मुद्दे जनतेच्या निदर्शनास आणून दिले. स्थानिक आमदारांनी अमळनेर शहर बिकानेर करुन टाकले. पाचशे रुपयाने मत विकत घेवून अमळनेर तालुक्याला कलंक लावला. तालुक्यात बेरोजगारी, गुंडागर्दी, दारु तस्करी, वाळू तस्करी वाढली. सरकारने कलम ३७० रद्द केले ते केंद्रात मात्र तो राज्यातील शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत प्रश्न नाही. तसाच १५० कि.मी. वर राहणारा तुमचा नेता असूच शकत नाही. अमळनेर तालुक्याला लागलेला हा कलंक पुसून काढण्याची जबाबदारी आता कष्टकरी भूमीपुत्रांची आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत तीन कर्ज माफी झाल्या आहेत .त्यात देहूच्या परिसरातील अवैध सावकारीचे कर्जरोखे इंद्रायणीत बुडवून पहिली कर्जमाफी राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज सन १६७४ मध्ये रायगडावर सिंहासनाधीश झाले तेव्हा दुसरी कर्जमाफी झाली. तिसरी ७२ हजार कोटीची सर्वात मोठी सरसकट कर्जमाफी आदरणीय शरद पवार यांनी सन २००९ मध्ये केली. आताच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा सहारा घेत फसवी कर्जमाफी केली असून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात कुठलीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. भाजपाशी एकनिष्ठ असलेले एकनाथराव खडसे यांना २०१९ च्या विधानसभेचे तिकीट नाकारुन त्यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भाजपाने भंग केले. हा खान्देशवर अन्याय असून मायभूमीचा मुख्यमंत्री नाकारल्याची खंत व्यक्त केली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंभर पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करीत बाहेरच्या पार्सलला याच भूमीत गाडून भूमीपुत्र अनिल पाटील यांना निवडून द्या असे आवाहन केले.
भूमीपुत्रासाठी भूमीपुत्रांनीच जमा केलेला निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हस्ते अनिल पाटील यांना स्वाधीन करण्यात आला. यावेळी शपथनामाचे प्रकाशनही करण्यात आले.ध पक्षाचे उमेदवार अनिल पाटील म्हणाले की, विद्यमान आमदार यांनी पाच वर्षात पाडळसरे धरणाचे एक इंच ही काम केले असते तर मी स्वतः त्यांना जाहीर पाठिंबा दिला असता. मला निवडून आणण्यासाठी तालुक्यातील भूमीपुत्रांनी मोठा निधी जमवून साथ दिली हे विसरता येणार नाही. जमा झालेला निधी राखून धरणाच्या कामासाठी वापरला जाईल. आता पक्षभेद बाजूला सारून सर्वांनी साथ द्यावी असे भावनिक आवाहन केले.