अमळनेर : कोविड १९ चा प्रादुर्भाव झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या रुग्णास तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड हेल्थ सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी हे युनिट उपलब्ध करुन दिले. सदर युनिट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे व डॉ.संदीप जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आज स्थितीला ३४ ऑक्सिजन सिलेंडर असून १० जम्बो सिलेंडर आहेत. कोविड रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होण्याची संभावना असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते यामुळे हे आधुनिक ऑक्सिजन काँन्सट्रेटर उपयुक्त ठरेल. अत्यवस्थ रुग्णांना फायदा होईल असे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.प्रकाश ताडे यांनी सांगितले.
दिनांक २२ मे रोजी अमळनेर नगरपरिषद कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी नगरपरिषद कार्यालय येथे करण्यात आली होती. याप्रसंगी शहरातील डॉ.अविनाश जोशी, डॉ.निखिल बहुगुणे, डॉ.संदीप जोशी, डॉ.नितीन पाटील, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.किरण पाटील आदींनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली. याप्रसंगी डॉक्टर अविनाश जोशी यांनी रुग्ण तपासणी कामी आवश्यक असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णांच्या उपचार कामी खरेदी करणे आवश्यक असल्याबाबत मत नोंदविले होते. त्यानुसार माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सूचना केल्यानुसार अमळनेर नगर परिषदेतर्फे काल डॉ.अविनाश जोशी यांच्या वाढदिवशी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी देण्यात आले. कोरोना विषाणू अमळनेर शहरासह ग्रामीण भागात पसरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना बाधितामुळे साखळी तुटलेली नसून वाढत चालली आहे. संक्रमण कसे होते ? हे समजत नसल्याने नागरिकांनी कृपया काळजी घ्यावी आणि शासन आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करून स्थानिक प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना सहकार्य करावे अशी विनंती माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे. सदर युनिट वितरणप्रसंगी याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, डॉ.प्रकाश ताडे, डॉ.संदीप जोशी, डॉ.अविनाश जोशी, न.प.चे संजय चौधरी, संजय पाटील, डॉ.राजेंद्र शेलकर, महेश जोशी, भाऊसाहेब सावंत यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शहरात कोरोना उपाययोजनेत अमळनेर पालिका प्रत्येक ठिकाणी आपले योगदान देत आहे.