बेपत्ता घोषित कोरोनाबाधित वृध्द महिलेचा मृतदेह कोविड रूग्णालयातील शौचालयात कुजलेल्या अवस्थेत आढळला
जळगाव : येथील कोविड रुग्णालयात दाखल झालेली भुसावळ येथील कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण दोन जूनला बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी उचलून धरल्यानंतर प्रशासन यंत्रणा कामास लागली होती. भुसावळ येथील त्या ८२ वर्षीय कोरोनाबाधित वृध्द महिलेचा मृतदेह कोविड रूग्णालयातील शौचालयात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातासह सात डॉक्टरांना निलंबीत करण्यात आले आहे.
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार केले जातात. परंतू आरोग्य यंत्रणा कोरोना बाधित रुग्णावर योग्य उपचार करत नसल्याचे, तेथे योग्य सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यातच आठ दिवसांपासून बेपत्ता घोषित कोरोना बाधीत महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या स्वच्छतागृहातच पडून असल्याची घटना समोर आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली. यामुळे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह दोन अधिक्षक व अन्य पाच डॉक्टरांना तडकाफडकी निलंबीत करण्याची कारवाई केली आहे. अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असून संबंधित महिलेबाबत ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे. त्यांना कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी जोर धरु लागली आहे.