अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसीचे नाव बदलून खान्देश शिक्षण मंडळ संचलित कै. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी असे करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या कडून मान्यता देण्यात आली आहे.
१५ जून रोजी खा. शि. मंडळाचा नाव बदल करण्याच्या ठराव व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचे नाहरकत प्रमाणपत्र ग्राह्य धरून परिषदेकडून नाव बदलाचा निर्णय घेण्यात आला. तसे पत्रक खा. शि. मंडळास प्राप्त झाले आहे. खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूल येथून सेवा निवृत्त झालेले शिक्षक शरदचंद्र पंढरीनाथ भांडारकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या नामकरणासाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी मंडळास दिली होती. ३ मार्च २०१९ रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते आणि श्रीप्रसाद शरदचंद्र भांडारकर व भांडारकर परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत नामकरण व उद्घाटन सोहळा झाला होता. या नाव बदलाच्या सरकारी प्रक्रियेसाठी खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे , कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल, संचालक डॉ.बी एस.पाटील, डॉ. संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल, जितेंद्र जैन, हरी भिका वाणी, कल्याण पाटील, चिटणीस डॉ. अरुण जैन व कॉलेज चे प्राचार्य प्रा. रविंद्र जी. माळी, प्रा. कुंदन पाटील यांनी प्रयत्न केले.