
शिरपूर : सध्या कोरोना चा संसर्ग संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने यावर्षी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी प्रतिपंढरपूर बाळदे व निमझरी येथील यात्रोत्सव रद्द करण्यात आले आहेत. साहजिकच भव्य यात्रेची सुरु असलेली परंपरा यावर्षी खंडीत होणार आहे. समस्त भाविक, व्यावसायिक यांनी गर्दी न करण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
सालाबादाप्रमाणे शिरपूर तालुक्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम बाळदे व निमझरी या दोन्ही ठिकाणी बुधवार, दि.१ रोजी आषाढी एकादशीला श्री पांडूरंगाची यात्रा येत आहे. मात्र, कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी यात्रेचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. या दिवशी पांडुरंगांंची नित्य नियमानुसार पुजा, काकड आरती, अभिषेक कार्यक्रम हे मंदिराचे पुजारी, विश्वस्त मंडळ व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होईल. यात्रोत्सव काळात होणारे किर्तन व भजन सोहळा देखील रद्द करण्यात आलेला आहे. भाविकांनी आपापल्या घरी पांडूरंगाचे नामस्मरण व पुजापाठ करावा. सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन बाळदे प्रतिपंढरपूर ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी पाटील व निमझरी ट्रस्टचे अध्यक्ष छगन गुजर यांच्यासह इतर विश्वस्त यांनी केले आहे.