आता तरी शासनाचे संबंधित अधिकारी जागे होणार का ?
अमळनेर : तालुक्यातील खौशी येथे काल सकाळी झालेल्या पहिल्याच पाऊसात गावालगत असलेला तलाव पाण्याने पूर्ण भरल्याने गावकऱ्यांना समाधान वाटले. पण.. हे समाधान फार काळ न राहता गावकऱ्यांची घोर निराशा झाली. काही वेळातच गावाला वरदान ठरणारा हा बंधारा वाहून गेल्याने तलाव कोरडा झाला. यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
अखेर दिव्यचक्र चे ते वृत्त खरे ठरले..! दि.१० जुलै २०१६ च्या साप्ताहिक दिव्यचक्र मधून ‘तलाव अखेरच्या घटका मोजतोय’ या मथळ्याखाली फोटोसह वृत्त प्रसिध्द झाले होते.
अमळगाव, खेडी, पातोंडा गावांना जोडणारा प्रमुख रस्ता या तलावाशेजारुन आहे. अनेक वाटसरु व वाहने या रस्त्यावरुन ये जा करीत असतात. यामुळे साहजिकच लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाळा सुरुवात असल्याने बंधारा त्वरीत दुरुस्त करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. शिवाय भविष्यात पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण होवू शकते. शासनाच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत हा बंधारा बांधण्यात आलेला असून आतापर्यंत तीन चार वेळा या बंधाऱ्यास भगदाड पडून साचलेले पाणी वाहून गेल्याने गावकऱ्यांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागले आहे. सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पाऊस कमीच असल्याने तलावाचे खोलीकरण करुन गाळ काढण्याचे काम झाल्याने तलावाचे पात्रही वाढले. मात्र शासन स्तरावर लक्ष दिले गेलेले नाही. त्यानंतरच्या काळातही ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करुन लोकवर्गणीतून वेळोवेळी हा बंधारा दुरुस्त केला होता. निसर्गाला ते ही मान्य झाले नाही. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जागे व्हायला हवे.