कोरोना संसर्ग न वाढण्यासाठी घेतली दक्षता
जळगाव : कोरोना बाधित रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही. तो संबंधित महापालिका, पालिकेच्या यंत्रणेला देऊन थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. नातेवाइकांनी तेथे कमीत कमी संख्येने यावे. पालिकेचे कर्मचारी योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार करतील. कोरोना चा प्रसार होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी तीन प्रकारची तपासणी सुरू झाली आहे. यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढतील, मात्र नागरिकांनी पॅनिक होऊ नये. जेवढे अधिक पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीसाठी येतील तेवढे ते लवकर बरे होतील. पॉझिटिव्ह रुग्ण लवकर बरे व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा प्रयत्नात आहे, असे सांगताना यापुढे कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही. त्यांच्यावर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाच अंत्यसंस्कार करतील, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्या आहेत.