अमळनेर : लॉकडाऊन काळात बंद असलेल्या व्यायाम शाळा आणि सलून व्यवसाय सुरु करण्याबाबत नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत बोलावण्यात आली होती. या बैठकीत ता.२८ जूनपासून व्यायामशाळा आणि सलून सुरु होतील असा निर्णय झाला आहे, अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
या बैठकीत सलूनचा व्यवसाय सुरु करण्याबाबत चर्चा झाली. यानंतर कोरोनाची विभागवार परिस्थिती लक्षात घेऊन सलून व्यवसाय सुरु करण्यात येणार आहे. याबाबत सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. सलूनमध्ये फक्त केस कापण्याची परवानगी असेल. सध्या दाढी करण्याची परवानगी नाही. केस कापणाऱ्याने आणि कापून घेणारे दोघांनाही मास्क बंधनकारक असेल,अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. राज्यातील नाभिक संघटनेकडून यासंदर्भात मागणी होत असताना आंदोलनाचीही भूमिका त्यांनी घेतली होती. अमळनेर येथील सलुन व्यावसायिकांच्या संघटनेने आमदार अनिल पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडल्याने त्यांनी मुंबई येथे गेल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत तसेच टॅक्सी व प्रवासी वाहतुकीच्या खाजगी वाहनांना प्रवासी क्षमता वाढविण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली होती. अखेर, संपुर्ण राज्यातून होत असलेली मागणी लक्षात घेता मंत्रिमंडळात सलूनचा व्यवसाय सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आमदार पाटील यांनी झालेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.