कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत नसेल तर कोरोनाचे काम बंद करण्याचा संघटनेचा ईशारा

अमळनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून शहरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने तोंडी आदेश देऊन कोरोना सर्व्हेचे काम दिले आहे. कोरोना विषाणूने अमळनेर शहरात कहर माजवत अनेक जणांचे बळी गेले आहेत. प्रशासनाच्या तोंडी सुचनेनुसार अंगणवाडी कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य विषयक माहिती संकलन करून दररोज न.पा.आरोग्य विभागास देत आहेत. दि.१७ जून रोजी अंगणवाडी मदतनीस अलका चौधरी ह्या कोरोनाचे नियमित काम करण्यासाठी रूबजी नगर येथे गेल्या असता, तेथील रहिवाशांनी त्यांना घेराव घालून कामाला मज्जाव करत धमकावले आणि तेथून हाकलून लावले. त्यामुळे श्रीमती चौधरी ह्या धास्तावल्या आहेत. सदर प्रकाराबद्दल त्यांनी त्याच दिवशी न.पा.वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सदर तक्रारीची आजतागायत कोणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम करत असताना या महिला कर्मचाऱ्यांबाबत काही विपरीत घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रांताधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, न.पा.आरोग्य विभाग घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासन घेत नसेल तर अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही क्षणी कोरोनाचे काम बंद करतील. असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी दिला आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!