इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरूवात
पातोंडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या व राजकारण्यांचा चांगलाच हिरमोड झाला. सप्टेंबर महिन्यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा ग्राम पंचायतची मुदत संपली. विस्तार अधिकारी चिंचोले यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. परंतु याच आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी वार्ड निहाय आरक्षण घोषीत केल्याने इच्छूकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
” एकूण तेरा पैकी सात जागा महिलांकरीता आरक्षित आहेत तसेच इतर जागांवर देखील महिलांनी निवडणूक लढवली तर सर्व ग्रा.पं.मध्ये महिला राज येण्याची शक्यता नाकारता येत नाही.” : सौ शितल महेंद्र पाटील, माजी सरपंच, पातोंडा
” वार्ड रचना व आरक्षण बदलल्याने निवडणूकीची सर्वच सुत्रे बदलली आहेत त्यामुळे प्रस्थापित व राजकारणात नवीन असणाऱ्या सर्वांनाच नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.” : सौ. मनिषा प्रविण बिरारी, माजी सरपंच, पातोंडा
पातोंडा गावाचे पाच प्रभाग असून तेरा (१३) सदस्य आहेत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकीत वार्ड रचना बदलली जाते. त्यानुसार या वर्षी वार्ड क्रमांक तीन मधील माजी सरपंच गजानन फकिरा बिरारी यांचे घरापासून ते संतोष उखा बिरारी यांचे घरापर्यंतचा संपूर्ण भाग वार्ड क्रमांक एकला जोडण्यात आला आहे. दोन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९६६ मधील नियम ५ (I) नुसार वार्ड निहाय आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार वार्ड क्रमांक एक मध्ये तीन जागा असून सर्वसाधारण – १ , नागरीकांचा मागास प्रवर्ग – १ , सर्वसाधारण महिला १ , वार्ड क्रमांक दोन मध्ये दोन जागा असून नागरीकांचा मागास प्रवर्ग – १ , सर्वसाधारण महिला – १ , वार्ड क्रमांक तीन मध्ये देखील दोन जागा असून सर्वसाधारण – १ व सर्वसाधारण महिला – १ , वार्ड क्रमांक चार मध्ये तीन जागा असून अनुसूचीत जमाती – १ , नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला – १ , सर्वसाधारण महिला – १ , वार्ड क्रमांक पाच मध्ये तीन जागा असून अनुसूचीत जाती – १ , अनूसुचीत जाती महिला – १ व नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला – १ या प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले असून सात जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे मागील पंचवार्षिक प्रमाणेच महिला राज असण्याची चर्चा नागरीकांमधून होत आहे. मागील वर्षी निवडणूकीच्या वेळी तयार झालेले पॅनल मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडीत संपुष्टात आल्याची चर्चा असून आता नवीन सूत्रे काय असतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बंद असलेली निवडणूक प्रक्रियेची पुर्वतयारी सुरू झाल्याने डिसेंबर च्या शेवटच्या किंवा जानेवारी च्या पहिल्या पंधरवाड्यात ग्रा.पं.निवडणूका लागण्याची शक्यता असल्याचे मत राजन बिरारी यांनी व्यक्त केले आहे.