
अमळनेर : शहरातील जीवन ज्योती कॉलनीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारीचा प्रश्न हा गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असून अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने परिसरातील रहिवाशांनी प्रा.जयश्री दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २ जून रोजी गटारीतील पाणी नेऊन नगरपरिषदेत उपोषण केले.

सन १९८७ पासून शहरात जीवन ज्योती कॉलनी अस्तित्वात आहे. शहरातील मध्यवर्ती भागात ही कॉलनी असून तेथील नागरिक नियमित कर भरत आहेत. गेल्या २० वर्षांपासून कॉलनीतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारीचा प्रश्न प्रलंबित असून यासंदर्भात वेळोवेळी अर्ज, विनंत्या, आंदोलने, उपोषण करूनही मार्ग निघालेला नाही. राजकीय नेते, अधिकारी येऊनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे प्रा.जयश्री दाभाडे यांनी ११ मे २०२१ रोजी न.प. प्रशासनास लेखी निवेदन देऊन दहा दिवसांत प्रश्न न सुटल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. तीन आठवडे उलटूनही कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने परिसरातील रहिवाशांनी जयश्री दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली गटारीतील पाणी बादल्यांमध्ये घेत पायी चालत नगरपरिषद गाठली. तेथे उपमुख्याधिकारी यांच्या टेबलवर गटारीच्या पाण्याच्या बादल्या ठेवत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी नगरपरिषदेसमोर नागरिक उपोषणाला बसले होते. यावेळी हरीश जैन, आरती शाह, दक्षा संघ, प्रतीक भुतडा व कॉलनीतील रहिवाशांसोबत मनोज पवार, अनिल पारधी, विजय साळुंके, पुनमचंद पारधी, राहुल बडगुजर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
