निकषांवर आधारित नियमावलीसाठी एकूण पाच स्तर निश्चित

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ही नियमावली भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे असून ती सोमवार दि.७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. प्रत्येक जिल्हा प्रशासन दि.३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल ? हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर काही तासात कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असा खुलासा राज्य शासनाने स्पष्ट केल्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला होता. अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली.
पाच टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील हा पहिला स्तर मानला जाईल. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर आहे आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत ते दुसऱ्या स्तरात मोडतील. पाच ते दहा टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा तिसरा स्तर मानला जाईल . तेथील व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील. दहा ते वीस टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा स्तर मानला जाईल आणि तेथे सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार व रविवार रोजी व्यवहार बंद असतील. २० टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ७५ टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.
पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. तसेच लग्न सोहळे व सार्वजनिक कार्यक्रम, सार्वजनिक वाहतूक देखील पुर्ण क्षमतेने सुरू होईल. दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील. तिसऱ्या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील. पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार व रविवार रोजी व्यवहार बंद असतील.
