शेतकरी वर्गासाठी कार्यशाळा व शेती उपयुक्त साधने मोफत वितरण समारंभ संपन्न

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती कडे वळावे : संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अमळनेर : कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, सानेगुरुजी फाउंडेशन – अमळनेर व कृषी विज्ञान केंद्र – ममुराबाद फार्म जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी वर्गासाठी कार्यशाळा व शेती उपयुक्त साधने मोफत वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म चे प्रमुख समन्वयक डॉ. हेमंत बाहेती, डॉ. स्वाती कदम, डॉ. वैरागर, किरण जाधव, मंडल कृषी अधिकारी किशोर साळुंखे, साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे समन्वयक प्रा. सुनील गरुड हे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

प्रा. सुनील गरुड यांनी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती सात राज्यांमध्ये करत असलेल्या विविध कामांचा सामाजिक उपक्रमांचा संस्कृती व शैक्षणिक कार्यक्रमांचा आढावा मांडला. श्री विजय नवल पाटील यांनीही राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा मांडला. डॉ.स्वाती कदम यांनी गांडूळ खत विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. किशोर साळुंखे यांनी सद्यस्थितीत शासनाच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शासन व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद वतीने शेतकऱ्यांच्या साठी राबवले जाणारे विविध उपक्रम नव्या शेतीचे तंत्रज्ञान, शेतकरी अवजारे व त्यांचे उपयोग, सेंद्रिय खतासाठी शेतकऱ्यांनी करावयाचे प्रयत्न याविषयी सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी वर्गाला सेंद्रिय खत, वनस्पती लागवड, बांबू लागवडीचे महत्त्व व शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे ? कशा पद्धतीने शेती कसावी ? यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी साने गुरुजी फाऊंडेशन -अमळनेर व छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती करीत असलेले काम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. डॉ. वैरागर यांनी गट शेती कश्या पद्धतीने करायची ? विक्री व्यवस्थापनच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी कशाप्रकारे संघटित होऊन शेतीमालाची विक्री करायची ? याविषयीच्या शासन योजना विस्तृतपणे शेतकऱ्यांना सांगितल्या. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते १५० शेतकऱ्यांना दुधाची कॅन, टीकम, पावडा, टोपली, निमार्क, ट्रायकोडर्मा व सेंद्रिय खताचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे सारेच कर्मचारी वृद सहभागी होते .ममुराबाद गावचे सरपंच तसेच वि.का.सोसायटीचे संचालक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक पवार, अनिल पाटील, प्रवीण पाटील, संगेश सूर्वे, जयेश माळी, अरुण सूर्यवंशी तसेच कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सुमारे दोनशे शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मागे राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे फार मोठे योगदान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण लाडवंजारी यांनी तर डॉ. विशाल वैरागर यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!