खान्देशसह लगतच्या जिल्ह्यांना अजूनही पाच दिवस मान्सूनची प्रतीक्षाच करावी लागणार; हवामान खात्याचा अंदाज

जळगाव : केरळात दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात १० जून पर्यंत दाखल होईल अशी स्थिती होती. मात्र अंदाज फेल ठरवत मान्सूनचे महाराष्ट्रात लवकर आगमन झाले. राज्याच्या काही भागात पाऊस स्थिरावला असतांना राज्याच्या इतर भागात मात्र पावसाने दांडी मारली आहे. कोकण, मुंबई भागात रेड अलर्ट जाहीर करावा लागला. मात्र उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा काही सीमावर्ती भाग तसेच मराठवाड्याच्या उत्तरेकडील काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. खान्देशसह लगतच्या जिल्ह्यांना अजूनही पाच दिवस मान्सूनची प्रतीक्षाच करावी लागेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. साहजिकच शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली आहे. तर काही ठिकाणी धूळपेरणी केली जात आहे सध्याच्या परिस्थितीत धूळ पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे आहे. एखाद्या वेळी दुबार पेरणीचे संकट देखील ओढवू शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी अजून मान्सून पोहचला नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या हवेतील बदलामुळे वाऱ्यांचा प्रवाह बदलला आणि त्यामुळे झारखंड आणि बिहारकडे मान्सून सक्रीय झाला आहे. त्याचबरोबर उत्तर – मध्य महाराष्ट्र व इतर लगतच्या भागात मान्सून कमी सक्रीय होण्याचे अजून एक कारण म्हणजे पश्चिमी वारे ज्या जोराने आले होते त्यांचा जोरही आता कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा कमजोर पडल्याने हवे त्या प्रमाणात बाष्प ओढले जात नाही. त्यामुळे या भागात पुढच्या चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पण अजूनही जोरदार पावसासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले. राज्यात जरी पाऊस सर्वदूर होत नसला तरी ज्या वेगाने राज्यात मान्सून दाखल झाला त्याच गतीने तो उत्तरेकडे सरकला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या ( १५ मे ) मान्सून राजधानी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!