आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप

अमळनेर : महाराष्ट्र राज्यात गेल्या महिन्यात तोक्ते चक्रीवादळात नैसर्गिक आपत्तीमुळे जीव गमावलेल्या आंचलवाडी येथील दोन सख्ख्या बहिणी आणि पळासदडे येथील पुरुष यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी चार लाखांची मदत प्राप्त झाल्याने आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सदर रकमेचे धनादेश अमळनेर तहसील कार्यालयात त्यांच्या वारसांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, आंचलवाडी व पळासदडे येथील ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.
सदर मदतीचे धनादेश आंचलवाडी येथील मयत रोशनी बल्लू बारेला व ज्योती बल्लू बारेला यांचे वडील बल्लू बारेला व त्यांची पत्नी तसेच पळासदडे येथील मयत दिलीप भादूगीर गोसावी यांचे वडील भादूगीर गोसावी यांचेकडे आमदारांनी सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अजून प्रत्येकी १ लाखाची मदत मिळू शकणार असल्याचे सांगत त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदारांनी सांगितले. दिनांक १६ जून रोजी ही घटना घडली होती. घटनेनंतर अवघ्या एक महिन्यात मदत प्राप्त झाल्याने मयताच्या वारसांसह दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी शासनाचेे आभार मानले.
दरम्यान महाराष्ट्र राज्यात मागील महिन्यात अनेक ठिकाणी वादळाचा धोका निर्माण झाला असताना अमळनेर तालुक्यातील आंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून त्यात पावरा समाजातील ज्योती बारेला (वय १६) आणि रोशनी बारेला (वय १०) या सख्या बहिणींचा मृत्यू झाला होता. रणाईचे येथे राजेंद्र भिमराव पाटील यांच्याकडे सालदारकी साठी बल्लू बारेला हे कुटुंंबासह आले होते. बल्लू बारेला ने गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती. दिनांक १६ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला. काही कळण्याच्या आत खळ्यातील चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून त्यात मुलगी ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोनही बहिणी दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. याच दिवशी तालुक्यातील पळासदडे येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळासह पाऊस सुरू झाल्याने मयत दिलीप भादुगीर गोसावी (वय ५७) हे त्यांच्या घराचे काम चालू असल्याने वादळासह पावसाने सुरुवात झाली असता ते पाहण्यासाठी व सिमेंट झाकण्यासाठी गेले असता, बांधकाम चालू असलेली भिंत त्यांच्या डोक्यावर पडून ते जखमी झाले होते. यामुळे जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर ते मृत झाले होते. दोन्ही घटनांचा तहसील कार्यालय मार्फत पंचनामा होऊन शासकीय मदतीसाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर झाला होता. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार अनिल पाटील व प्रशासनाने देखील योग्य पाठपुरावा केल्याने दोन्ही कुटुंबाना ही मदत लवकर मिळाली असून सदर मदतीमुळे या दोन्ही कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वितरण
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना देखील यावेळी प्रत्येकी वीस हजार रक्कमेचे धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यात, कै.प्रदीप लक्ष्मण ठाकूर यांचे वारस रूपाली प्रदीप ठाकूर रा.अमळनेर, कै.वसंत आसमन भिल यांचे वारस हिराबाई वसंत भिल रा.दापोरी बु., कै.जगदीश नामदेव पाटील यांचे वारस वंदना जगदीश पाटील रा.देवगाव, कै.प्रवीण शिवाजी पाटील यांचे वारस अर्चना प्रवीण पाटील रा.दहिवद, कै.राजू बाबुराव पारधी यांचे वारस आशाबाई राजू पारधी रा.अमळनेर, कै.शांताराम भोजु भिल यांचे वारस शेवकाबाई शांताराम भिल रा.दापोरी बु., कै.भाऊसाहेब गोरख पाटील यांचे वारस छायाबाई भाऊसाहेब पाटील रा.दहिवद, कै.ईश्वर महादू पाटील यांचे वारस मायाबाई ईश्वर पाटील रा.अमळनेर.आदींना धनादेश देण्यात आले. सर्व लाभार्थ्यांनी आभार व्यक्त केले.
