
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्या शुक्रवारी दुपारी १ वाजता राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांचा ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे. सन २०२१ दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ४ हजार ४४१ विद्यार्थी होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने शासन निर्णयातील मूल्यमापन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. मूल्यमापन पद्धतीनुसार इ.९ वी चार अंतिम निकाल, इ.१० वी चे वर्षभरातील अंतर्गत लेखी मुल्यमापन, इ.१० वी चे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक व अंतर्गत मुल्यमापन इ.च्या आधारे माध्यमिक शाळांकडून विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या http://result.mh-ssc.ac.in किंवा www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर सर्व विषयाचे गुणांसह निकाल उपलब्ध होतील.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुण आणि त्यांच्या मूल्यमापन संदर्भात १० जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली होती. ही कार्यवाही ३ जुलै पर्यंत पूर्ण करून राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर केला जाणार होता. आता एक दिवस उशीराने निकाल जाहीर होणार आहे.
