
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत आज सोमवारी पेट्रोल २७ पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर १०७.२० तर डिझेलच्या दरात घट झाली आहे. डिझेल १७ पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईतील लोकांना डिझेलसाठी ९७.२९ रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्लीत आज पेट्रोल २८ पैशांनी महागले आहे तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे १०१.१९ रुपये आणि ८९.७२ रुपये मोजावे लागतील. भोपाळमध्ये पेट्रोल १०९.५३ रुपये तर डिझेल ९८.५० रुपये आहे. तर कोलकातामध्ये लोकांना पेट्रोलसाठी १०१.०१ रुपये आणि डिझेलसाठी ९२.८१ रुपये मोजावे लागतील. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
