जळगाव जिल्हा पोलिस दलाकडून सर्व नागरिकांना व तरुणांना आवाहन
जळगाव : उद्या तारीख २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मत मोजणी प्रक्रिया होणार असून निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजा मध्ये फटाके वाजवणे, गुलाल उधळणे, अर्वाच्य घोषणा देणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात. त्यामुळे वाद होऊन मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे दुष्परिणाम नागरिकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात. पुंगळ्या काढून मो/सा फिरवणाऱ्याचे मोटर सायकल वर कठोर कायदेशीर कारवाई करून मोटरसायकल संबंधित सर्व गुन्हे अशा लोकांवर दाखल करण्यात येतील. कोणत्याही विजयी रॅलीला परवानगी देण्यात येणार नाही. आगामी दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये गुन्हा दाखल झालेनंतर तुरुंगात/जेलमध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही. भविष्य काळ खुप अंधारात जाईल याची जाणीव असावी.
विजय शांततेत /संयमाने साजरा करणे गुन्हा नाही. परंतु पुंगळ्या काढून मो/सा फिरवणे, ट्रिपल सीट मोटार सायकल चालवणे, विरोधकांच्या घरासमोर फटाके वाजविणे, बेकायदेशीररित्या वाद्य लावून मिरवणूक का टगढणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने विरोधकांना चिथावणी देणे, समाजातील शांतता बिघडविणे, मागील वादावरून भांडण करणे, वाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरणे, आवाजाचे प्रदूषण करणे हे गंभीर गुन्हे असून असे गुन्हे करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
मतदान प्रक्रिया उत्साहात, शांततेत पार पाडल्या व जळगावच्या नावाला शोभेल असे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे जळगाव जिल्हा पोलीस दलाने आभार मानले आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यात मतमोजणी प्रक्रियाही शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.