ग्रामीण भागातील मतदानाचा सर्वाधिक टक्का अंदाज बदलणार

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये शिवसेनाला जादा जागांवर यश

अमळनेर : निवडणुकांमध्ये या पंचवार्षिकला प्रथमच अमळनेर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ग्रामीण भागातून अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी पाऊस असूनही सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या. मतदार स्वंयस्फूर्तीने मतदार केंद्रांकडे जातांना दिसले. विशेष म्हणजे महिला व नवमतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अनेक ठिकाणी शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदानाचा सर्वाधिक टक्का वाढला. राज्यात २०१४ मध्ये भाजपच्या विरोधात लढूनही शिवसेनेने ६३ जागा जिंकताना सुमारे ३५ जागा थोड्या फरकाने गमावल्या होत्या. त्या ३५ पैकी काही जागा भाजपने तर बाकी काँग्रेस आघाडीने जिंकल्या होत्या. तेव्हा शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी मोदींनाच प्रमुख शत्रू मानून प्रचार केला होता. त्यामुळे शिवसेनाला मिळू शकणारी काही काठावरची मतेही भाजपकडे वळली. अन्यथा पाच वर्षांपूर्वी भाजपच्या बरोबरीत शिवसेना असे चित्र दिसू शकले असते. यावेळी शिवसेनाने भाजप सोबत युती केली असल्याने शिवसेनाला काही जादा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यमांच्या मतदानोत्तर चाचण्या जाहीर झाल्या आहेत. यानुसार शिवसेनेला सर्वाधिक फायदा होताना दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप, शिवसेनेसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीने २०१४ ची निवडणूक स्वबळावर लढली होती. त्यावेळी भाजपला १२२, शिवसेनेला ६३, काँग्रेसला ४२, राष्ट्रवादीला ४१ आणि इतरांना २० जागा मिळाल्या होत्या.

मतदारांचा कौलही महत्वाचाच…

या निवडणूकीत ताज्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप, शिवसेना महायुतीला २३५ – २४५ जागा तर काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीला ४५ – ५० जागा आणि इतरांना ४ – १० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या सर्व्हेनुसार भाजपला काही जागांचा लाभ होताना दिसत आहे. मात्र, त्यात रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आदी मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे. त्या तुलनेत शिवसेनेला जास्त फायदा होताना दिसत आहे. शिवसेनेला भाजपने जागा वाटपात केवळ १२४ जागाच सोडल्या होत्या. कमी जागा पदरात पडून सुद्धा यंदा शिवसेना चांगली कामगिरी करताना दिसत आहे. यावेळी शिवसेना ६३ जागांवरून थेट ८० – १०२ जागांवर मुसंडी मारताना दिसत आहे, म्हणजे शिवसेनेला मोठा फायदा होताना दिसत आहे. तसे झाल्यास शिवसेनाला सत्तेत बरोबरीचा वाटा द्यावा लागू शकतो. साहजिकच यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २००९ च्या निवडणूकीत मतदारांनी साथ दिली होती. मागील २०१४ च्या पंचवार्षिक निवडणूकीत अपयश आले. मात्र २०१९ च्या निवडणूकीत काहीसे यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्याने उभरणाऱ्या वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाने एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरले होते तथापि वाटाघाटी फिस्कटल्याने स्वतंत्र चूल मांडत निवडणूक लढविली. यामुळे फारसा फायदा दिसून येणार नाही. दोघांची युती झाली असती तर निश्चितच फायदा होवून अन्य पक्षांचा मोठा तोटा झाला असता. वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत राहिली असती. यावेळी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मनसे व वंचित बहुजन आघाडीला स्पष्ट अपयश दिसत असले तरी ते प्रत्यक्ष निकालावेळी काही प्रमाणात यश मिळविणार अशीही मतदारांमध्ये चर्चा आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!