‘मराठी लाईव्ह न्युज’ वेब पोर्टल च्या पाचव्या वर्धापनदिनी झाला कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान व विचारांची पेरणी
अमळनेर : चांगल्या कार्यात सर्व जण नेहमीच सहभागी होतात. मात्र दुःखाच्या वा संघर्षाच्या प्रसंगी चांगला माणूस एकटाच पडतो. चांगले काम करुनही नतभ्रष्ट लोकांकडून काही गोष्टींचा अपप्रचार केला जातो. साहजिकच त्या चांगल्या माणसाला वेदना असह्य होतात. अशावेळी चांगल्या माणसाच्या पाठीशी जनतेने उभे राहण्याची नितांत गरज आहे असे मत व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील साने गुरुजी ग्रंथालय समोरील जुना टाऊन हॉल येथे ‘मराठी लाईव्ह न्युज’ वेब पोर्टल च्या वर्धापनदिनी काल दिनांक ६ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन ‘कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन यांनी कार्याचा लेखाजोखा मांडला. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपायुक्त कपिल पवार, निवृत्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर, नोबेल फाउंडेशन चे अध्यक्ष जयदीप पाटील, महात्मा फुले शिक्षण संस्था देवगाव चे अध्यक्ष विलासराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. ओ. माळी, मराठी वाड्मय मंडळाचे उपाध्यक्ष शामकांत भदाणे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मराठी लाईव्ह न्युज चे ईश्वर महाजन यांनी मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.
निवृत्त डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांनी पाच वर्षाच्या अल्प काळात मराठी लाईव्ह न्युज पोर्टलने केलेली प्रगती व सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या दहा व्यक्तींना ‘कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, बुके, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. सोबतच व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉ. डिगंबर महाले, साप्ताहिक विंग च्या जिल्हाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तर उत्कृष्ट डिझाईन कामासाठी सहकार्य करणारे लक्ष्मीकांत सोनार यांचादेखील मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
‘कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४’ चे मानकरी…
- १. श्री मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर (अध्यात्मिक)
- २. विजय पाटील, स्वादिष्ट नमकीन, अमळनेर (युवा उद्योजक)
- ३. प्रा. सुभाष सुकलाल पाटील, शिरूड, ता. अमळनेर (कृषी)
- ४. डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे, साई हॉस्पिटल, अमळनेर (वैद्यकीय)
- ५. सौ. सुषमा वासुदेव देसले पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच दहिवद, ता. अमळनेर (सामाजिक व राजकीय)
- ६. शरद तुकाराम धनगर, करणखेडा, ता. अमळनेर (साहित्य)
- ७. आर.आर. सोनवणे, बेटावद, ता. शिंदखेडा – सेवानिवृत्त क्रीडा व विज्ञान शिक्षक (शैक्षणिक)
- ८. सुनील प्रभाकर वाघ, जी. एस. हायस्कूल, अमळनेर (क्रीडा)
- ९. सौ. छाया संदीप पाटील, पोलीस पाटील- पष्टाणे, ता. धरणगाव (सामाजिक)
- १०. सागर सुखदेव कोळी, पाडळसे, अमळनेर (युवा प्रेरणा)
साहित्यिक वा. ना. आंधळे म्हणाले की, एखाद्याचा सत्कार होणे म्हणजे कान टोचण्याचा प्रकार. सत्कार स्विकारणाऱ्या व्यक्तीला जबाबदारी स्विकारुन अधिक चांगले काम करावे लागते. सत्कारातून प्रेरणा मिळत असते. आधाराशिवाय जो माणूस चालतो तोच उंची गाठतो हे सांगताना डॉ. एपीजे अब्दुल कलाम, रतनजी टाटा यांची उदाहरणे दिली.
पत्रकार समाज घडविण्याचे व दिशा देण्याचे काम करीत असतो. पत्रकारितेत झपाट्याने वाढ होत आहे. सोबतच जिल्हा आवृत्त्या स्वतंत्र झाल्याने सर्वत्र बातमी येईलच याची शाश्वती नसते. प्रिंट मीडिया कमी होत होत असून वेब पोर्टल, चॅनल्स वाढत आहेत. डिजिटल युगात मेसेज फॉरवर्ड करताना जागरुक असणे आवश्यक असल्याचे महात्मा फुले हायस्कूल देवगांव चे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी सांगितले. एखादं पद मिळवणं व ते टिकवण्यासाठी व्यक्तीमत्व चांगलं असावं लागतं. एखाद्या कृतीला स्वतःचे उत्तर असावं. ज्येष्ठ लोकांकडून तो ठेवा जपायला हवा असे विचार आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपायुक्त कपिल पवार यांनी व्यक्त केले.
नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील म्हणाले की, ज्यांना कर्तृत्व गौरव पुरस्कार मिळाला ते सर्व कार्यकर्तृत्वाचे दिवे आहेत. ते सतत तेवत राहतात तेव्हा समृध्द भारत तयार होतो. एखाद्या सिग्नल वर कोण कशी शिटी वाजवतो यावर तो देश कसा ? तेथील संस्कृती कशी ? हे ठरत असते. पत्रकारिता ही केवळ माहितीची देवाणघेवाण नाही तर ते शक्तिशाली शस्त्र आहे. त्याचा वापर कसा आणि कशासाठी करायचा हे पत्रकारांवर अवलंबून आहे. पेड न्यूज च्या काळात सत्ताधाऱ्यांच्या मदमस्तीला अंकुश लावण्यासाठी, सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करु शकतो. मतदानाचे तुम्ही शस्त्रधारी, देशाच्या संस्कृतीचे केंद्रबिंदू आहात. व्हाटस्अप, इंस्टाग्राम, फेसबुकवर श्रध्देचे रुपांतर अंधश्रध्देत नको. श्रध्दा हा देशाचा आत्मा असून अंधश्रध्देला हात लावावा असे ही ते म्हणाले. पुरस्कारार्थीं मधून प्रातिनिधिक स्वरुपात डॉ. प्रशांत शिंदे व सौ. सुषमाताई देसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सौ. वसुंधरा लांडगे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी मराठी लाईव्ह न्युज चे ईश्वर महाजन व सौ. ज्योती महाजन यांची भरभरुन प्रशंसा केली व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.अशोक पवार, धनगर दला, श्याम पवार, एस. डी. देशमुख सर, माळी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी दिनेश माळी, एन.आर चौधरी, दिलीप सोनवणे, दिपक पवार, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, बी.एस.जाधव, मा.नगरसेवक प्रताप साळी, उदयोजक निलेश पाटील, प्रभुदास पाटील ,मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अमोल पाटील, भैय्यासाहेब मगर, विनोद जाधव, डॉ. विशाल बडगुजर, रवि पाटील, मधु बाळापूरे, प्रमोद पाटील, महेश पाटील, दशरथ लांडगे, लक्ष्मीकांत सोनार, रविंद्र चौधरी, रणजित शिंदे, डॉ. रवींद्र चौधरी, गणेश भामरे, मंगळ ग्रह संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, हिंदी अध्यापक मंडळ, वाचनालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार यांचेसह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.