गुरुवार, दिनांक १४ रोजी भव्य शोभायात्रेसह पर्यावरणविषयक जनजागर; भव्य वृक्षदिंडीचेही आयोजन
अमळनेर : मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे शुक्रवार, दिनांक १५ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य स्वरूपात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह महासोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर रोषणाईने उजळून निघाले आहे. गुरुवार, दिनांक १४ रोजी भव्य शोभायात्रा काढण्यासह पर्यावरणविषयक जनजागर करण्यासाठी भव्य स्वरूपातील वृक्षदिंडीचेही आयोजन केले आहे. संत श्री सखाराम महाराज वाडी येथून सकाळी ९ वाजता निघणाऱ्या शोभायात्रेत माता-भगिनी पारंपरिक भारतीय वेषात उपस्थित राहणार असून संस्कृती आणि परंपरेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर सजवलेला कलश तसेच छोटेखानी तुळशी वृंदावन असणार आहे. शोभायात्रेचा मार्ग दगडी दरवाजातून तिरंगा चौक- कोंबडी बाजार- नगरपालिकेच्या पाठीमागून सुभाष चौक- राणी लक्ष्मीबाई चौक- मोठा बाजार- फरशी पूल- चोपडा नाका मार्गे असेल. श्री मंगळग्रह मंदिर येथे शोभायात्रेची सांगता होईल. शोभा यात्रेदरम्यान वेतोशी, रत्नागिरी येथील शिवकालीन मर्दानी कसरतीचे खेळ देखील असतील. शोभायात्रेच्या प्रारंभी सर्वांसाठी नाश्ताचे तसेच शोभायात्रा संपल्यानंतर मंदिरात स्नेहभोजनाची सोय करण्यात आली आहे.
फक्त माता-भगिनींसाठी हळद व संगीतसंध्या कार्यक्रम…
गुरुवार, दिनांक १४ रोजी शोभायात्रादिनीच दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वर-वधूला हळदीचा तसेच संगीतसंध्येचा फक्त माता-भगिनींसाठीचा कार्यक्रम होईल. सदर कार्यक्रमात माता-भगिनींना पूर्णपणे प्रायव्हसी असेल. त्यामुळे नृत्यकलेसह अन्य पारंपरिक तथा सांस्कृतिक कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘मंगल सूर’ या फिमेल ऑर्केस्ट्राचीही संगत लाभणार आहे. सदर प्रसंगी उपस्थित माता-भगिनींसाठी सायंकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवार, दिनांक १५ रोजी श्री तुळशी विवाह महासोहळा…
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात श्री तुळशी विवाह महासोहळा होणार आहे. यासोबतच महाप्रसादासाचेही आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दिव्य शाही विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आणि जयश्री साबे यांनी केले आहे.