सुरेशदादा जैन यांची प्रकृती खालावली

आधुनिक सोयी सुविधांअभावी त्यांना मुंबईत जे. जे. रुग्णालयात हलविणार

जळगाव : येथील बहुचर्चित घरकूल घोटाळ्यातील माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मंगळवारी नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

न्यायालयीन निकालानंतर जळगावच्या या घरकुल गैरव्यवहारात दोन महिन्यापूर्वी सुरेशदादा जैन व अन्य दोषींना नाशिकरोड कारागृहात दाखल करण्यात आले आहे. या घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन मुख्य आरोपी आहेत. त्यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारागृहात दाखल झाल्यापासूनच जैन यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना इतर कैद्यांप्रमाणे विशेष काम देण्यात आले नव्हते. वेळप्रसंगी त्यांना कारागृहाच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत असे. प्रकृती सुधारल्यावर कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात येत असे. कालपासून त्यांची प्रकृती जास्तच खालावली. श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. त्यांना चालणे व बोलणेही अवघड जाई. रोज मधुमेहाचे इंजेक्शन्स तसेच औषधे घ्यावी लागत आहेत. जैन हे हाय प्रोफाईल व्यक्तीमत्व असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर कारागृह प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवून त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध केली जात होती. जिल्हा रुग्णालयात त्यांच्या विविध आजारांवर उपचार करण्याच्या आधुनिक सोयीसुविधा नसल्याने त्यांना मुंबईत जे. जे. रुग्णालयात हलविले जाणार असल्याचे समजते. जिल्हा रुग्णालयातून त्यांची सुटका झाल्यावर त्यांना कारागृहात आणले जाईल. परवानगी आणि कागदपत्रांचे सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे कळते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!